
- मालेगावमध्ये परीक्षा सुरु असताना संतापजनक प्रकार; संशयितास बेड्या
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : परीक्षा सुरु असताना प्राध्यापकाने विद्यार्थिनीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार मालेगाव येथील एका महाविद्यालयात घडला आहे. वाजीद अली नामक या संशयिताला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या प्रकाराची संपूर्ण शहरभर प्रतिक्रिया उमटत असून संशयितास कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, संशियत हा संबंधित महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. सोमवारी घडलेल्या प्रकारात प्रथम वर्षातील राहिलेल्या विषयाची परीक्षा देणाऱ्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनीकडे त्याने अश्लील वर्तन करून शरीरसुखाची मागणी केली. प्रारंभी गोंधळलेल्या विद्यार्थिनीने स्वतःला सावरत महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे धाव घेवून झालेला प्रकार कथन केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी तत्काळ येत प्राध्यापकाला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेची शहरभर वाच्यता झाल्यानंतर विद्यार्थिनीचे नातलग तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते महाविद्यालय परिसरात जमले. झाल्या प्रकाराबाबत त्यांनी संताप व्यक्त करीत संशयितावर कठोर कारवीची मागणी केली.
तडकाफडकी निलंबन; चौकशीसाठी समिती
या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेऊन महाविद्यालय प्रशासनाने संशयित सहायक प्राध्यापक वाजीद अली याला तडकाफडकी निलंबित केले. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी महाविद्यालयीन स्तरावर तीन सदस्यीय तर संस्था स्तरावर चार सदस्यीय समिती नियुक्तीची घोषणा केली.
Comments are closed.