
- निमा अध्यक्ष आशिष नहार यांना विश्वास
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या बुधवारी ( दि. ६ ) आयोजित ‘कुंभ उद्योग संगम’ आणि ‘नाशिक जिल्हा गुंतवणूक समिट’ द्वारे हजारो कोटींची गुंतवणूक नाशकात प्रत्यक्षात साकारणार आहे. हे समिट नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने एकप्रकारे वरदान ठरणार असून नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच निमाच्या सातत्याच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केले.
आगामी कुंभमेळा म्हणजे नाशिकच्या क्षेत्राच्या विकासाची एक प्रकारे पर्वणीच असून त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे असे म्हटले तर ते निश्चितच वावगे ठरणार नाही. ‘कुंभ उद्योग संगम’ परिषदेच्या नियोजनासाठी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि जिल्हाधिकारी आयूष प्रसाद सह विविध शासकीय अधिकारी आणि औद्योगिक संगठनेचे पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
त्यामुळे नाशिकच्या पदरात निश्चितच भरीव पॅकेज पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे आणि मुंबई येथे आता औद्योगिक विस्ताराची संधी नसल्याने औद्योगिक विकासाच्या नकाशावर नाशिकला ठळक प्राधान्य देण्याच्यादृष्टीने शासन स्तरावरून सुरू असलेल्या उपायोजना एक प्रकारे शुभसंकेतच असून ६ मे रोजीच्या समिटमध्ये प्रत्यक्षात काय निर्णय होतात याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यात नाशिकचा समावेश झाला नव्हता. मात्र पुढील टप्प्यात नाशिकचा समावेश व्हावा यासाठी निमाने केंद्र आणि राज्य सरकारकडे केलेल्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे ही मागणी मान्य झाल्याचे संकेत मिळत असल्याने नाशिकच्या उद्योजकांसाठी एकप्रकारे हा सुखद धक्काच असल्याचे नहार यांनी पुढे नमूद केले.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशकात दळणवळणाची साधने,महामार्ग आणि कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारली आहे.विविध कामांसाठी काढण्यात येणाऱ्या निविदांमुळे स्थानिक उद्योजकांनाही लाभ होणार आहे. भविष्यात गुंतवणूकदारांचा ओघही त्यामुळे वाढणार आहे. समिटमध्ये मोठ्या प्रमाणात होणारे सामंजस्य करार म्हणजे उदयोन्मुख उद्योजकांसाठी एकप्रकारे त्यांच्या विकासाची नांदी ठरणार आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानाच्या धर्तीवर नाशिकला कायमस्वरूपी प्रदर्शन केंद्र उभारावे, नाशिक विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करावा तसेच तेथे नाईट लँडिंग ची व्यवस्था करावी, कार्गो सेवेचा विस्तार करावा व निफाड तालुक्यात होऊ घातलेल्या डायपोर्टला मोठ्या प्रमाणात गती द्यावी आदी मागण्यांचा उहापोह निमातर्फे या समिटमध्ये करण्यात येणाऱ असल्याचेही नहार यांनी सांगितले. नाशिक जिल्ह्यातील किंवा बाहेरील ज्याही उद्योगांना सदर समिट मधे गुंतवणूक जाहीर करून सुविधा मिळवण्यासाठी करारनामा करावयाचा असेल त्यांनी निमा कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी केले.
Comments are closed.