NGN News
Latest Marathi News

रिंगरोड प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात; शेतकऱ्यांचे उपोषणास्त्र

  • भूसंपादनावरून जमीन मालकांचा प्रशासनाच्या विरोधात शड्डू

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निर्णायक ठरणारा रिंगरोड प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण या प्रकल्पासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनावरून जमीन मालकांनी प्रशासनाच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. जमीन मोबाद्ल्यासह तत्सम विषयांवर नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवार ( दि. २६) पासून उपोषणास बसल्याचा इशारा दिला आहे.

रिंगरोड साठी करावयाच्या भूसंपादनाविरोधात सुमारे २५ गावे एकत्र आली आहेत. शेतकऱ्यांना संपवण्याचा शासनाचा डाव असून त्यासाठी भूमाफियांना हाताशी धरले जात असल्याचा आरोप शेतकरी नेते साहेबराव दातीर, कैलास खांडबहाले आणि विनोद नाठे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भूसंपादन करताना शेतकरी वर्गाला विश्वस्त घेतले जात नाही. भेदाभेद करणाऱ्या प्रशासनाकडून भूसंपादनाचा मोबदला देताना आपपरभाव केला जातो. यासंदर्भात गौळाणे आणि बेळगाव ढगा या दोन गावांतील मोबदल्याचे उदाहरण माध्यमांना देण्यात आले. शेतकरी महिलांना मारहाण करणाऱ्या पवन दत्ता सारख्या अधिकाऱ्याविरोधात कोणत्याही प्रकराची दाखल घेतली जात नाही, याबद्दल तीव्र असंतोष असून याला सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.

थेट मंत्र्यावर आरोप..

दरम्यान, रिंगरोडचा घाट घालताना शहरापेक्षा भूमाफियांचे हित डोळ्यासमोर ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला. एका विशिष्ट मंत्र्यांनी पुढे केलेली माणसे जमिनी बघतात आणि संबंधित शेतकऱ्याला अडचणीत आणून त्याला व्यवहार करण्यास भाग पडतात. या सर्व गोष्टी सन्मानपूर्वक होणे गरजेचे आहे. याबाबत ना मंत्री, न लोकप्रतिनिधी, ना प्रशासन बोलायला तयार आहे. हाच मुद्दा समोर ठेवून उद्या मंगळवारपासून रामकुंड परिसरात उपोषणास प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित गावांमध्ये बैठका घेवून आंदोलनाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Comments are closed.