NGN News
Latest Marathi News

खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा; आर्थिक साम्राज्याची होणार चौकशी

  • सर्व महत्त्वाची कागदपत्रे ईडीच्या ताब्यात

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : अनेक महिलांचे लैंगिक शोषण करण्यासह जमिनी हडपणे, आर्थिक गैरव्यवहार यांसारखे आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. या प्रकरणात आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उडी घेतली असून खरातविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केल्याने खरात याच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. रविवारी नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणाची ईडी द्वारे चौकशी करण्याची घोषणा केली होती आणि लगोलग दुसऱ्या दिवशी त्याचा प्रत्यय आला देखील.

अशोक खरातवर केवळ बलात्काराचेच नाही, तर फसवणूक करून कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचेही गंभीर आरोप आहेत. नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, ईडीने आता या आर्थिक गैरव्यवहाराच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी जमा केलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे ईडीने आपल्या ताब्यात घेतली असून, खरातचे हे अफाट आर्थिक साम्राज्य नेमके कसे उभे राहिले, याची कसून चौकशी केली जाणार आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?

अशोक खरात प्रकरणात एसआयटी सखोल तपास करत आहे. तो रोजच्या रोज जाहीर करता येणार नाही. भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्याच्या सर्व व्यवहारांची चौकशी केली जाणार आहे. ईडीने या प्रकरणाची माहिती घेतली आहे. त्यामुळे त्याची ईडी चौकशी केली जाणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली होती. 

Comments are closed.