
- आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता गडद
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : रोजगार मिळवून देण्याच्या बहाण्याने महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या मुख्य आरोपी आणि तथाकथित माध्यमकर्मी रवींद्र एरंडे याच्याकडून पोलिसांनी आतापर्यंत चार मोबाईल फोन जप्त केले आहेत. सातपूर परिसरात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात जप्त मोबाईलमधील ‘डाटा’ रिकव्हर करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विशेष म्हणजे, असून तपासादरम्यान आतापर्यंत आठ पीडित महिलांची ओळख पटवण्यात आली आहे. यामुळे आरोपीवर आणखी काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता गडद झाली आहे.
रवींद्र एरंडे याने स्वतः सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की, चार जण त्याला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बारा लाख रुपयांची खंडणी मागत आहेत. पोलिसांनी या चार जणांना अटक केली खरी, मात्र तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले. एरंडेच्या टॅबमध्ये तब्बल ८७ अश्लील व्हिडिओ सापडल्याने, खंडणी मागणाऱ्या तक्रारदाराचाच खरा चेहरा समोर आला आणि पोलिसांनी त्याला गजाआड टाकले. आरोपीने गरजू महिलांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांचे नाशिक तसेच इगतपुरी येथील हॉटेल्समध्ये लैंगिक शोषण केले होते. तपासात आतापर्यंत आठ पीडितांची ओळख पटली असून, यामध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आणि कंपनीत काम करणाऱ्या महिलांचा समावेश आहे.
नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच एनजीओ चालक तथा माध्यमकर्मी रवींद्र एरंडे याच्या लीलांनी प्रचंड खळबळ माजवली. महिलांसोबत तयार करण्यात आलेले व्हिडिओ केवळ ब्लॅकमेलिंगसाठी वापरले जात होते की त्यांची ‘ब्लू फिल्म’ म्हणून विक्री केली जात होती, यादृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. आरोपीवर बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Comments are closed.