
- अशोक खरात प्रकरण : समता पतसंस्थेत ६५ बनावट खाती; चार दिवसात २०० व्यवहार
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : बेनामी खात्यांतून ५२ कोटी काढून भोंदू अशोक खरातचा स्वतःचा बचाव करण्यासाठी न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याचा प्लान होता. त्यासाठीच अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून त्याने संशयास्पद व्यवहार केल्याची माहिती चौकशीमध्ये समोर आली आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि उत्पन्न करपात्र होऊ नये, यासाठी बँकिंग नियमातील दोन लाख मर्यादेची पळवाट देखील खरातने शोधल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे.
महिला लैंगिक अत्याचार आणि अन्य प्रकरणात खरात गेल्या दोन महिन्यांपासून कारावासात आहे. त्याची विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी सुरु आहे. प्राप्त माहितीनुसार, खरातला पोलिसांकडून अटकेची चाहूल लागली होती. अटक टाळण्यासाठी त्याने कोपरगाव येथील समता पतसंस्थेत ६५ बनावट खाती उघडून केवळ चार दिवसात २०० हून अधिक व्यवहारांद्वारे ५२ कोटी रुपये काढले. या रकमेसह त्याचा परदेशात पलायनाचा प्लॅन होता. पतसंस्थेतील बनावट खात्यांमध्ये चाकणकर भागीनिंसह महसूल आणि आरटीओ विभागांतील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांच्या तसेच अनेक प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांच्या नावेही खाती असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांकडून स्वतःचा बचाव करण्यासाठी खरातने न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याची जय्यत तयारी केली होती. परदेशात अनेकांशी संबंध असल्याने तिथे स्थायिक होऊन पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा त्याचा प्रयत्न होता.
Comments are closed.