NGN News
Latest Marathi News

दुहेरी हत्याकांडाने साक्री हादरले; भोंदुगिरीने बळी घेतल्याचा संशय

** अंबादास बेनुस्कर

पिंपळनेर : एनजीएन न्यूज नेटवर्क

साक्री तालुक्यातून एक दुहेरी हत्याकांडाची घटना समोर आली आहे. साक्री तालुक्यातील वर्धाने आणि उभरांडी शिवारात दोघांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली असून हे दुहेरी हत्याकांड भोंदुगिरीच्या नादी लागल्याने झाल्याचे बोलले जात आहे.या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित भोंदुला ताब्यातही घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार,आज सकाळी भडगांव (वर्धाने) टेंभे फाट्याजवळ विवाहितेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अंगावर अॅक्सेस १२५ (एमएच १८ सी,एफ ८१५१) ही दुचाकी टाकण्यात आलेली होती. तसेच महिलेचे तोंड रुमालाने बांधलेले असल्याने हा घातपाताचा प्रकार असल्याचे पोलिसांच्या लागलीच लक्षात आले. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ विवाहितेची ओळख पटवली. सदर मृत महिलेचे नाव जयश्री रजनीकांत काकुस्ते (२५) असून ती कासारेची रहिवासी आहे. बचत गटांसाठी ती बजाज फायनान्समार्फत कलेक्शनचे काम करायची. काल रात्री शेवटच्या वेळेला तिचे पतीशी कॉलद्वारे संभाषण झाले. त्यानंतर तिचा फोन बंद येत होता. आज सकाळी तिच्या खुनाची बातमी समजताच काकुस्ते परिवार हादरला. जयश्रीच्या मृतदेहाजवळ तिची पर्स व मोबाईलही होता. त्यामुळे ही हत्या लुटीतून झालेली नसल्याचे उघड झाले आहे.परिणामी, जयश्रीचा खून कोणी केला? हा प्रश्न सर्वांना सतावू लागला.

संशयित ताब्यात

पोलिसांनी अवघ्या काही मिनीटांतच संशयित योगेश उर्फ भैय्या बापू खैरनार (रा. जैताणे ) याला ताब्यात घेतले.त्याने पोलिसांना दिलेली माहिती त्याहून खळबळजनक होती. जयश्रीचा एक व्यक्ती खून करत होता. आपण तिला वाचविण्यासाठी गेलो, त्यातच आपल्या हातून त्या तरुणाचा जीव गेल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. शिवाय त्या तरुणाचा मृतदेह उभरांडी (जैताणे) शिवारातील निर्जन वनात त्याच्या गौशाळा वजा मठाजवळील टेकडीवर पुरल्याचेही सांगितले.यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा उभरांडी शिवारात वळविला. त्या ठिकाणाहून तरुणाचा मृतदेह पोलिसांनी हस्तगत केला.या मृतदेहाची देखील ओळख पटली असून त्याचे नाव अक्षय सोनवणे (२८) असून तो भाडणे गावाचा रहिवासी आहे.दरम्यान,योगेश हा बनवेगिरी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.मात्र, पोलिसांनी आधी पुरलेला मृतदेह ताब्यात घेण्यास प्राधान्य दिले. यासाठी भोंदुला देखील घटनास्थळावर नेण्यात आले होते.

दोघांची हत्या एकाच ठिकाणी ?

जयश्री काकुस्ते आणि अक्षय सोनवणे यांची हत्या एकाच ठिकाणी झाल्याचे सांगितले जात आहे. संशय येवू नये म्हणून दोघांचे मृतदेह विभिन्न दिशेला टाकण्यात आले.विवाहितेच्या तोंडावर बांधण्यात आलेल्या रुमालावरुन आणि मोबाईलच्या लोकेशनवरुन पोलिसांना मोठी लिड मिळाली.तसेच घटनास्थळावर चारचाकी वाहनाची चिन्हे मिळून आली होती.श्वान पथकाने देखील पोलिसांना महत्वपुर्ण दिशा दाखवली.त्याचमुळे काही तासातच संशयित जेरबंद होवू शकला.मिळालेल्या माहितीनुसार,मठात वाद झाल्याने योगेश खैरनारने आधी अक्षयच्या डोक्यात रॉड टाकून त्याची हत्या केली.त्यानंतर जयश्रीला तिच्याच दुचाकीवर बसवून नेत वाटेत तिचीही हत्या करण्यात आली.मात्र, महिलेच्या मृतदेहाजवळ आढळलेला रुमाल महाराजचा असल्याने पोलिसांचा संशय पक्का झाला होता.

निजामपूर पोलिसांकडून क्विक अॅक्शन

जयश्री काकुस्ते यांच्या हत्येची माहिती मिळताच निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी मयूर भामरे तात्काळ घटनास्थळावर आपल्या टीमसह पोहचले.सदर घटना वरिष्ठांना कळवत त्यांनी महत्वपुर्ण धागेदोरे जुळवले. फॉरेन्सीक, एलसीबी, डॉग स्क्वॉड आणि निजामपूर पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम राबवत मुख्य संशयिताला ताब्यात घेतले.घटनेची माहिती मिळताच एएसपी अजय देवरे देखील घटनास्थळावर पोहचले होते. दरम्यान,या दुहेरी हत्याकांडाची उकल जवळपास झाली असून हे हत्याकांड भोंदुगिरीच्या नादी लागल्यानेच लागल्यानेच घडल्याचे उघड झाले आहे.

योगेश हा भोंदू भगत

विश्वसनिय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,योगेश हा गुढ्या वथून भविष्य सांगतो अशी चर्चा आहे.शिवाय उभरांडी रस्त्यालगत त्याचा मठ असून त्याला महाराज म्हणून ओळखतात. त्याच्याकडे अनेकजण आपली अडलेली कामे घेवून येतात.जयश्री आणि अक्षय देखील त्याच्याकडे हवन करण्यासाठी गेले होते अशी चर्चा घटनास्थळावर ऐकायला मिळाली.

Comments are closed.