NGN News
Latest Marathi News

जगदगुरु शांतिगिरीजी महाराजांच्या धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

ओझर : अमर आढाव

निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज धार्मपीठाचे पिठाधीश्वर अनंत विभूषित स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी पुणे येथील जुन्नर तालुक्यातील विविध धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेट दिली.यावेळी त्यांचे विविध संस्थांनच्या वतीने जगदगुरूंचे स्वागत व पूजन करण्यात आले.

रत्नागिरी जिल्ह्यातील नरवण येथे होत असलेल्या धर्म सोहळ्यासाठी जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या सह भाविकांचे प्रस्थान ओझर आश्रमातून झाले.प्रारंभी पहाटेच्या मंगलमय नित्य नियम विधी,आरती संपन्न झाली. त्यानंतर प्रवासास प्रारंभ झाला.भगवान ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवले त्या आळे येथील श्री रेडेश्वर महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्यात आले. येथे भाविकांनी श्रद्धेने नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

यानंतर अष्टविनायकांपैकी एक असलेल्या श्री विघ्नहर गणपती मंदिर ओझर (पुणे) येथे श्रींचे मनोभावे दर्शन घेण्यात आले. मंदिर परिसरात भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले होते. पुढे लेण्याद्री गिरिजात्मक गणपती मंदिर येथे जाऊन गणरायाचे पूजन करण्यात आले. डोंगरकड्यावर वसलेल्या या पवित्र स्थळांचे दर्शन जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत लाभल्याने भाविकांनी आध्यात्मिक ऊर्जा अनुभवली. या संपूर्ण दौऱ्याचा अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानास्पद टप्पा म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ला येथे जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी दिलेली भेट होय. या ऐतिहासिक ठिकाणी बाबाजींनी शिवछत्रपतींच्या जन्मभूमीचा इतिहास जाणून घेतला तसेच उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. स्वराज्याच्या इतिहासाची उज्ज्वल परंपरा आणि त्यामागील त्याग, पराक्रम यांची जाणीव सर्वांना करून देण्यात आली.

या धर्मयात्रेदरम्यान धर्म, अध्यात्म, इतिहास आणि संस्कार यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. विविध ठिकाणी असलेल्या संस्थानच्या वतीने जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे स्वागत व पूजन करण्यात आले.भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत भक्तीभाव व्यक्त केला. या पवित्र भेटींमुळे भाविकांच्या मनात श्रद्धा, प्रेरणा आणि संस्कारांची जागृती झाल्याचे दिसून आले. एकूणच, ही धर्मयात्रा केवळ धार्मिक कार्यक्रम न ठरता अध्यात्मिक उन्नतीसोबतच इतिहासाची जाणीव करून देणारी आणि संस्कार वृद्धिंगत करणारी ठरली.

Comments are closed.