NGN News
Latest Marathi News

जय बाबाजी परिवाराच्या वतीने वेरुळ येथे महायज्ञाचा शुभारंभ

  • १०८ कुंडात्मक महायज्ञ; हजारो भाविकांचा सहभाग

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : अमर आढाव
वेरूळ येथील निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज आश्रमात, उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत, अक्षयतृतीया निमित्त आठवडाभर जपानुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर “जय बाबाजी”, “जय घृष्णेश्वर” अशा जयघोषात १०८ कुंडात्मक भव्य महायज्ञाचा शुभारंभ करण्यात आला.

कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज यांनी सुमारे ५० वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र वेरूळ येथील आश्रमात अक्षय तृतीयेच्या पर्वकालावर वार्षिक महायज्ञ परंपरेची सुरुवात केली होती. त्यांच्या या कार्याची परंपरा उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरू स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी आजतागायत अखंडित आणि यशस्वीरित्या सुरू ठेवली आहे.

या सोहळ्याच्या निमित्ताने वेरूळ येथे ‘ॐ जगदगुरु जनशांती धर्म सोहळ्या’चेही आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत जनकल्याणार्थ १०८ कुंडात्मक भव्य महायज्ञ संपन्न होत आहे. या महायज्ञाचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न पंडित कमलाकर गुरु शिवपुरी हे करत असून, हा महायज्ञ दोन टप्प्यांत पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील यज्ञाचा शुभारंभ २३ एप्रिल रोजी होणार असून त्याचे पौरोहित्य वेदशास्त्रसंपन्न पंडित विलासगुरु कुलकर्णी हे करणार आहेत.

राजस्थानी पद्धतीच्या भव्य आणि दिव्य स्वरूपात येथे यज्ञमंडपाची उभारणी करण्यात आली आहे. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात जपानुष्ठान, महायज्ञ, महिला जप, अखंड नंदादीप, हस्तलिखित नामजप, प्रवचन, भजन, सत्संग,श्रमदान,पालखी सोहळे अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास राज्यभरातून हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

Comments are closed.