
- आर्थिक व्यवहारातून मारहाणीचा आरोप; शहरभर खळबळ
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून एकाने फिनाईल पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याने शहरभर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुर्तडक यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, योगेश दाभाडे हे शिवसेना कार्यकर्ते असून परिचयातून त्यांनी अशोक मुर्तडक यांच्याकडून ९० लाखांची रक्कम उसनवार घेतली होती. तथापि, हो रक्कम व्याजासह परत केल्यानंतर देखील मुर्तडक यांनी त्यांना आणि त्यांच्या परिवाराला अश्लील शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दाभाडे यांचा आरोप आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून दाभाडे यांनी फिनाईल पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मुर्तडक हे मनसेत असताना महापौर पदावर होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना उबाठा, भाजप, शिवसेना असा राजकीय प्रवास केला आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने शहरभर खळबळ उडाली आहे.
उबाठा नेत्याकडून माजी सैनिकाची फसवणूक
दुसऱ्या एका प्रकारात माजी सैनिक असलेले अनिलकुमार शिवराम बारी यांची शेतीच्या व्यवहारातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना उबाठा महापालिका गटनेते केशव पोरजे यांच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारात आपली ९ लाखांपेक्षा अध्क रकमेची फसवणूक झाल्याची तक्रार बारी यांनी केली आहे. पोरजे यांच्यासह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शेतजमिनीच्या कारणावरून झालेल्या वादातून माजी नगरसेवक शिवाजी चुंभळे यांनी संबंधित व्यक्तीवर हल्ला केल्याचा आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित व्यक्तीच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित गुन्ह्याची नोंद केली आहे.
Comments are closed.