
- डॉ. गेडाम यांनीच ‘स्पेलिंग मिस्टेक’वरून केला भंडाफोड; अज्ञाताविरोधात गुन्हा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा आयुक्त तथा नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीने सुमारे ७० कोटी रुपयांच्या कामांचे बनावट कार्यारंभ प्रती तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. एका अज्ञात ठगाने डॉ. गेडाम यांच्या बनावट स्वाक्षरीने प्रत्येकी ३५ कोटींच्या दोन कामांच्या कार्यारंभ प्रती तयार केल्याची बाब उघड झाली. नीलकंठ शेवाळे नामक व्यक्तीने हे पत्र दाखवले असता पडताळणीत पत्रावरील स्वाक्षरी आपली नसल्याचे डॉ. गेडाम यांच्या ध्यानी आले. शेवाळे यांच्या कार्यारंभ आदेशात सीसीटीव्ही सर्वेक्षण प्रणाली कार्यान्वित करणे, एआय आधारित सुरक्षा व्यवस्था पुरवणे असा उल्लेख होता. स्वाक्षरीत असलेल्या स्पेलिंग मधील चुकीने हा गैरप्रकार उघड झाला. डॉ. गेडाम यांचे स्वीय सहायक विजय सोनवणे यांच्या तक्रारीनंतर अज्ञात व्यक्तीविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अशी झाली गैरप्रकाराची उकल ..
शेवाळे यांच्याकडील पत्र नांदेड येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गजानन पाटील यांनी दिल्याचे सांगण्यात आले. त्यामध्ये अभिषेक संजय झरे, संस्थापक संचालक इन्होव्हेटीव एआय ओटोमेशन सोल्युशन एजन्सी यांच्या नवे कार्यारंभ आदेश आहेत. पत्राच्या वस्तुस्थितीबाबत साशंकता निर्माण झाल्याने शेवाळे हे विभागीय आयुक्तालयात आले असता प्राधिकरण सहायक संशोधन अधिकारी योगेश सोमवंशी यांना कागदपत्रे संशयास्पद वाटली. त्यांनी ती डॉ. गेडाम यांना दाखवली असता स्पेलिंगमध्ये असलेली चूक ध्यानी आली. त्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला.
Comments are closed.