
- खासदार वाजे यांच्या मागणीला यश
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने दीर्घकाळ प्रलंबित असलेली थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी अखेर साकार झाली असून, या यशामागे खासदार राजभाऊ वाजे यांच्या सातत्यपूर्ण आणि दूरदर्शी पाठपुराव्याची ठळक छाप उमटली आहे. भारतीय रेल्वे कडून नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा नाशिकच्या दृष्टीने विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
नाशिकसारख्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या शहराला देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांशी थेट जोडण्याची गरज अनेक वर्षांपासून प्रकर्षाने जाणवत होती. या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम दि. २ डिसेंबर २०२४ रोजी खासदार वाजे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करत अयोध्या, तिरुपती, कटरा, वाराणसी आणि अजमेर या तीर्थक्षेत्रांसाठी थेट रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली होती.
ही मागणी केवळ पत्रापुरती मर्यादित न ठेवता, तिचा सातत्याने पाठपुरावा करत ती केंद्र सरकारच्या प्राधान्यक्रमावर आणण्यात खासदार वाजे यशस्वी ठरले. परिणामी, भारतीय रेल्वे कडून नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली आहे. हा नाशिकच्या दृष्टीने विकासाचा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
विशेषतः अयोध्या कॅन्ट – मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) आणि बनारस – पुणे (हडपसर) या मार्गांवरील गाड्यांमुळे नाशिककरांसाठी धार्मिक प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सुसंगत झाला आहे. यामुळे केवळ भाविकांनाच नाही, तर नाशिकच्या पर्यटन आणि अर्थकारणालाही नवी चालना मिळणार आहे. या सेवांचे लोकार्पण दि. २८ एप्रिल रोजी करण्यात आले. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर देखील या गाडीचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
@ नाशिक हे देशातील प्रमुख धार्मिक केंद्र आहे. तसेच नाशिक व परिसरातील भाविक देखील मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनासाठी देशभर भ्रमंती करत असतात. या नवीन गाड्यांमुळे त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. तसेच इतरही मार्गावर गाड्या सुरू व्हाव्यात यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
: राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
Comments are closed.