
- मध्यरात्री थरार; विशेष पथक संशयिताच्या शोधार्थ रवाना
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : काडीमोड घातलेल्या पत्नीचे बंदुकीचा धाक दाखवून अपहरण केल्याची खळबळजनक घटना सातपूर परिसरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संशयित अक्षय युवराज पाटील ( रा. बदलापूर, जि. ठाणे) याचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, मूळ सातपूरचा रहिवासी असलेल्या अक्षय याचा काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. मात्र, त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याचे पत्नीला कळल्यावर दोघांत मतभेद निर्माण झाले. आपण गुन्हेगारी सोडून सर्वसाधारण जीवन जगू असा शब्द अक्षय याने दिल्याने पुन्हा त्यांचा संसाराचा गाडा रुळावर आला. तथापि, अक्षय याने त्याचा मूळ गुन्हेगारी पिंड न सोडल्याने पत्नीने त्याच्यापासून काडीमोड घेत ती माहेरी सातपूरला राहू लागली. शनिवारी (दि. १८) मध्यरात्री अक्षय बदलापूरहून नाशिकला आला. सासुरवाडीतील लोकांना धमकावत त्याने गोंधळ घातला. यावरच न थांबता रिव्हॉल्व्हरसारख्या हत्याराचा धाक दाखवत पत्नीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात बसवले आणि तिचे अपहरण करून पळ काढला. या घटनेने प्रचंड घबराट निर्माण झाली.
पिडीतेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात अक्षयच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एक विशेष पथक संशयिताचा माग काढण्यासाठी तातडीने ठाणे आणि मुंबई परिसरात रखाना झाले आहे.
Comments are closed.