
- जबरदस्ती दारू आणि सिगरेट पाजली; संशयित आरोपी तंजीर इनामदार याला बेड्या
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : शहरात आणखी एक धक्कादायक प्रकाराची उकल झाली आहे. एका तरुणीला जबरदस्ती दारू आणि सिगरेट पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात आला, शिवाय तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त करण्यात आले. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपी तंजीर इनामदार याला अटक केली आहे. बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघेही अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळत आहे. शहरात भोंदूबाबा अशोक खरात, रवींद्र एरंडे, टीसीएस लैंगिक अत्याचार आदि प्रकरणांची मालिका सुरु असताना या नव्या अध्यायाने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, पीडित तरुणीने संशयित तंजीरच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी अत्याचार केले. तिला बळजबरीने दारू आणि सिगरेट पिण्यास भाग पाडले. अनेकदा शुद्ध नसतानाही तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. आरोपीने पीडितेच्या गळ्यातील तुळशीमाळ आणि हातावर बांधलेला धागा बळजबरीने तोडून टाकला. तिला एका विशिष्ट धर्माच्या रिवाजाप्रमाणे ‘गजवा-ए-हिंद’चे पालन करण्यास सांगून धर्मांतरासाठी प्रचंड दबाव टाकला. जानेवारी 2026 मध्ये आरोपीने पीडितेच्या गळ्याजवळ चावा घेऊन हे ‘लव्ह बाईट’ असल्याचे सांगत तिचे आक्षेपार्ह फोटो मोबाईलमध्ये काढले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि कुटुंबाची बदनामी करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार लॉजवर नेले आणि बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले.
संशयित तंजीर याने अशाच पद्धतीने शहरातील आणखी काही मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे शोषण केले का, या दिशेने पोलीस तपास करीत आहेत. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे शहरवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
Comments are closed.