
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत सहा खासदारांनी पक्षातून वेगळा होत दिल्लीत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन स्वतंत्र गट स्थापन केल्याचे अधिकृत पत्र सादर केले आहे. या नव्या गटाला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिल्याने संसदेतील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्वतंत्र गट लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात विलीन होण्याची शक्यता आहे.
काल रात्रीपासूनच ठाकरे गटातील काही खासदार दिल्लीत दाखल होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत पोहोचले होते. बंडखोर खासदारांना काही काळ अज्ञातस्थळी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासह लोकसभा अध्यक्षांची भेट घेत स्वतंत्र गट स्थापन करण्याचा दावा केला आणि आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर या गटाला अधिकृत मान्यता मिळाली.
पक्षांतरबंदी कायद्यानुसार महत्त्वाचा टप्पा
पक्षांतरबंदी कायद्यानुसार, गट विभाजनासाठी संबंधित पक्षाच्या एकूण संख्येच्या किमान दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा आवश्यक असतो. ठाकरे गटाचे एकूण नऊ खासदार असल्याने सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यामुळे हा निकष पूर्ण झाला आहे.
ऑपरेशन टायगर चर्चेत
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ ची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सुरुवातीला याला दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळालेला नव्हता. १० जून रोजी झालेल्या एनडीए बैठकीनंतर घडामोडींना वेग आला आणि अखेर या हालचालींना अंतिम स्वरूप मिळाले.
शिंदे गटात सामील झालेले खासदार:
- संजय जाधव
- संजय देशमुख
- नागेश पाटील आष्टीकर
- ओमराजे निंबाळकर
- भाऊसाहेब वाकचौरे
- संजय दिना पाटील
या घडामोडींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Comments are closed.