
- दराडे यांच्या प्रचारातील सहभागाविषयी संदिग्धता
- विरोधकांची एकजूट आणि महायुती मतांच्या विभाजनाची नेत्यांना भीती
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील गेल्या अनेक दिवसांच्या पोलिटिकल ड्राम्यानंतर नाशिकमधील महायुती उमेदवाराचे टेन्शन कमी झाले असले तरी ते अगदी निकालापर्यंत कायम राहणार असण्याची चिन्हे आहेत. कारण अपक्ष उमेदवारीतून तीन मंत्र्यांची दमछाक करणाऱ्या गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी नरेंद्र दराडे यांना पाठींबा देण्याविषयी संदिग्धता पाळली आहे. शिवाय, मतपत्रिकेवर त्यांचे नाव कायम राहणार असल्याने आणि तिसरा उमेदवार रिंगणात नसल्याने दगाफटका झाल्यास विपरीत निकाल लागू शकतो, अशी धास्ती दराडे आणि महायुतीला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीपर्यंत नेमकी काय परिस्थिती उद्भवते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
नाशिक मतदारसंघ भाजपमधील बंडखोरीमुळे अवघ्या राज्यभर चर्चेत राहिला. गणेश आणि गोकुळ या गीते बंधूनी महायुती उमेदवाराविरोधात बंड केल्यानंतर गणेश गीते यांनी अखेरच्या दिवशी माघार घेतली. मात्र, निवडणूक लढवण्याच्या इराद्याने गोकुळ गीते यांनी प्रचारास प्रारंभही केल्याने महायुती गोटात चिंतेचे वातावरण होते. राज्यस्तरावरील नेत्यांनी समजूत घालूनही गीते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर गुरुवारी गोकुळ गीते यांनी मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत माघार घेण्याचे जाहीर केले. तथापि, दराडे यांचा प्रचार करणार का या मुद्द्यावर मौन बाळगल्याने त्यांच्या भूमिकेबाबत सस्पेन्स कायम आहे.
क्रॉस वोटिंग झाल्यास चमत्कार..
या निवडणुकीत पक्षाचा व्हीप नसतो. शिवाय विरोधी महाविकास आघाडीकडे उमेदवार नसला तरी १५४ एव्हढे संख्याबळ आहे. गीते यांचे सर्वपक्षीय नगरसेवकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मतपत्रिकेत गोकुळ गीते यांचे नाव कायम राहणार असल्याने विरोधक चमत्कार करण्याच्या इराद्याने एकवटले आणि महायुतीतील दीडशे मतदारांनी क्रॉस वोटिंग केले तरी धक्कादायक निकाल लागू शकतो. म्हणूनच महायुती नेते अखेरपर्यंत चिंतेत राहणार आहेत. गीते यांच्या मतानुसार, दराडे यांच्याबाबत प्रचंड नाराजी असून त्यांची उमेदवारी अनेकांना नकोशी असताना ती लादण्यात आली आहे. यामध्ये वास्तव असल्यास ऐन निवडणुकीत दराडे विध उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणूनच महायुतीचे टेन्शन निकालापर्यंत कायम राहणार आहे.
Comments are closed.