NGN News
Latest Marathi News

अखेर सस्पेन्स संपला; गोकुळ गीते यांची निवडणुकीतून माघार

  • महायुतीचे नरेंद्र दराडे यांच्या आमदारकीचा मार्ग मोकळा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती उमेदवाराच्या विरोधात शड्डू ठोकलेल्या अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी अखेर सस्पेन्स संपवला आहे. सदर निवडणुकीचा प्रचार थांबवत असल्याचे गीते यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. याप्रसंगी उपस्थित कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी, गोकुळ गिते विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केल्यामुळे आता नाशिक मतदारसंघात महायुतीचे अधिकृत म्हणून शिवसेनेचे नरेंद्र दराडे हेच असणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

भाजप नेते तथा गोकुळ यांचे ज्येष्ठ बंधू गणेश गीते यांच्या निवासस्थानी काही तास खलबते चालल्यानंतर माध्यमांशी संवाद साधण्यात आला. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे, आमदार सुहास कांदे, माजी नगरसेवक गणेश गिते, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते आदी यावेळी उपस्थित होते. गोकुळ गिते यांनी बंधू गणेश गिते यांच्यासह बुधवारी मुंबईत मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत यांची भेट घेतली होती. या भेटीत गिते यांच्याशी नाशिक विधानपरिषद निवडणुकीत संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यानंतर गोकुळ गिते यांनी आज निवडणुकीचा प्रचार थांबवत असल्याचे जाहीर केले. गोकुळ गिते यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. अखेर या प्रयत्नांना आज यश आल्याचे बघायला मिळाले.

.. आणि गीते यांचा काढता पाय

पत्रकार परिषदेत जेव्हा निवडणुकीतून थांबलात ठीक, पण नरेंद्र दराडे यांना तुमचा अधिकृत पाठिंबा आहे का, असा थेट प्रश्न विचारताच गोकुळ गिते यांनी कोणतेही उत्तर न देता ते ताडकन उठून तिथून निघून गेले. तत्पूर्वी, आपल्या मनातील खदखद त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली. गीते म्हणाले,  मी कोणत्याही चौकशीला घाबरलो नाही, सर्वांचा आदर राखला जावा, या हेतूने मी माघारी फिरलो आहे. लोकांच्या मागण्या मान्य करा, तुमच्या घरात दोन आमदारकी आहेत, लोकांचे प्रश्न सोडवा, असा सल्ला त्यांनी दराडे बंधूंना दिला. एकंदरीत निवडणुकीतून माघार घेवूनही गीते यांचा दराडे यांच्याबद्दलचा राग कायम असल्याचे यावेळी जाणवले.

‘सुप्रीम’ कारवाईच्या भीतीतून माघार ?

या संपूर्ण घडामोडींमध्ये ‘दबाव तंत्र’ वापरले जात असल्याचा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. महायुतीच्या नेत्यांकडून सुरू असलेली मनधरणी आणि दुसरीकडे गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांच्या प्रकरणात झालेला पत्रव्यवहार यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्य सरकारच्या कायदेशीर सल्लागार सहसचिवांनी अतिरिक्त सरकारी वकील, उच्च न्यायालय यांना पाठवलेले एक पत्र यानिमित्ताने चर्चेत आले आहे. या पत्रामध्ये गोकुळ गीते यांचे बंधू गणेश गीते यांना नाशिकमधील म्हाडा प्रकरणात उच्च न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या सूचना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. गीते बंधूंनी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच ( 1 जून ) गणेश गीते यांच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याबाबतचे पत्र प्राप्त झाल्याचे समोर आले आहे. या दबावापोटीच गोकुळ गीते माघारी गेल्याचे सांगण्यात येत आहे.

Comments are closed.