NGN News
Latest Marathi News

नाशिकला मिळणार नियमित मेट्रो; ५८ किलोमीटर मार्गिका साकारणार

  • महामेट्रोचा ८ हजार कोटींचा प्रस्ताव; पहिल्या टप्प्यात गंगापूर ते नाशिक रोड आराखडा

नाशिक : बहुचर्चित टायरबेस्ड निओ मेट्रो प्रकल्प अव्यवहार्यतेपोटी गुंडाळल्यानंतर नाशिक शहरातील वाढत्या वाहतूक व्यवस्थेवर आता मेट्रोचा पर्याय दृष्टीपथात येण्याची शक्यता गडद झाली आहे. शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला गतिमानतेचे कोंदण लाभावे यासाठी मुंबई-पुण्याच्या धर्तीवर नियमित मेट्रो साकारण्याच्या निर्णयावर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, नाशकात एकूण ५८ किलोमीटर मेट्रो मार्गिका साकारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात गंगापूर ते नाशिक रोड आराखडा प्रस्तावित आहे. सदर प्रकल्प ८ हजार कोटींचा असणार आहे.

यासंदर्भात, मुंबईत बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत संबंधित विषयावर चर्चा करण्यात आली. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महामेट्रोचे एमडी श्रावण हार्डीकर, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खात्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत विविध पर्यायांचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर नियमित मेट्रो सुरु करण्याबाबत एकमत झाले. त्यांतर्गत एकूण ५८ किलोमीटर मेट्रो मार्गिका साकारण्यात येणार असून त्याची तयारी म्हणून महामेट्रो अधिकाऱ्यांचे पथक पुढील महिन्यात प्रकल्प स्थळाच्या पाहणीसाठी शहरात येणार आहेत.

प्रत्यक्ष काम कुंभमेळ्यानंतर सुरु होणार

बैठकीत गंगापूर गाव ( शिवाजी नगर ) ते नाशिक रोड हा मेट्रोचा पहिला टप्पा असण्यावर चर्चा करून शिक्कामोर्तब करण्यात आले. भविष्यात, शहरात गरज असलेल्या ठिकाणांचा तसेच ओझर ते नाशिक या मार्गावर मेट्रो सुरु करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील प्रत्यक्ष काम सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर सुरु होण्याची शक्यता आहे. शहरात आधीच रस्ते खोडून ठेवल्याने नागरिकांत असलेला असंतोष लक्षात घेता त्यात मेट्रोच्या कामांमुळे खोदकाम झाल्यास भर पडेल. म्हणूनच मेट्रोच्या प्रत्यक्ष कामासाठी अजून किमान दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Comments are closed.