NGN News
Latest Marathi News

जगदगुरु शांतीगिरीजी महाराजांच्या उपस्थितीत ५ हजार तास श्रमदान

  • वेरूळ येथील आश्रमात भव्य श्रमदान मोहीम संपन्न

** एनजीएन न्यूज नेटवर्क

ओझर : अमर आढाव
कठोर तपस्वी, निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांनी सुरू केलेली श्रमदानाची पवित्र परंपरा त्यांचे उत्तराधिकारी अनंत विभूषित जगदगुरु स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू असून, वेरूळ येथील आश्रमात एकाच दिवसात तब्बल ५ हजार तास श्रमदान करून श्रमप्रतिष्ठा वाढवण्याचे प्रेरणादायी कार्य करण्यात आले.


कठोर तपस्वी,निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी महाराज यांनी श्रमदानाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अनेक आश्रम उभारले, विहिरी बांधल्या,अनेक शिवमंदिरांचा जीर्णोद्धार केला तसेच नापीक व खडकाळ जमिनीतही नंदनवन फुलवण्याचे कार्य केले. त्यांच्या या दिव्य कार्यपरंपरेचा वारसा जपत जगदगुरु शांतीगिरीजी महाराज यांनी सव्वा कोटी तास श्रमदानाचा महासंकल्प हाती घेतला असून, त्यातील ५० लाखांहून अधिक तास श्रमदान पूर्ण झाले आहे.महाराष्ट्र आणि देशातील विविध भागात त्यांनी श्रमदानाचे प्रभावी कार्य केले. याच मोहिमेअंतर्गत वेरूळ आश्रमात पार पडलेल्या श्रमदानात विविध कामे करण्यात आली. यामध्ये गुरुकुलाच्या सुमारे १००० फूट वॉल कंपाऊंडचे बांधकाम, आश्रम परिसराची स्वच्छता, तसेच शेतीसंबंधित कामांचा समावेश होता. या उपक्रमात ५३ गवंडी आणि ५०५ भाविकांनी सक्रिय सहभाग घेतला. विशेष म्हणजे, १०० महिलांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत श्रमदानाला बळ दिले.


या श्रमदानासाठी आठवडाभर आधी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. सकाळी ६.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत अखंड श्रमदान करण्यात आले. त्यानंतर अधिकमास निमित्त ब्रह्मवृद्धांच्या मंत्रघोषात सामूहिक पूजापाठ, सदगुरु चरण पादुका पूजन, श्रीगणपती व महादेव अभिषेक यांसारखे धार्मिक विधी पार पडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भाविकांना प्रसाद म्हणून फळे, रुद्राक्ष, श्रीफळ व चरणपादुका देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रमिय संत ब्रह्मचारी रामानंदजी महाराज यांनी केले. यावेळी आश्रमातील संत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही श्रमदान मोहीम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, “श्रमातून सेवा आणि सेवेतून साधना” हा संदेश यामधून अधोरेखित झाला.

Comments are closed.