- संघटनेत प्रामाणिक काम करणाऱ्यांना भविष्यात मोठी संधी – बाळासाहेब थोरात
नाशिक : एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त शहराध्यक्ष निलेश (बबलू) खैरे यांच्या पदग्रहणाचा भव्य सोहळा काँग्रेस भवन, महात्मा गांधी रोड, नाशिक येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य व माजी मंत्री बाळासाहेब थोरात होते.
यावेळी मार्गदर्शन करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “आज देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाच्या विचारांची गरज अधिक आहे. अशा परिस्थितीत संघटनेत प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होतील. काँग्रेस भवनातील आजची प्रचंड गर्दी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता काँग्रेसची ताकद आजही कायम असल्याचे स्पष्ट होते. नाशिक शहरातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मोठा संघर्ष उभा करण्याची गरज आहे. पक्षाच्या या लढ्यात मी सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. जुने आणि नवे कार्यकर्ते यांना एकत्र घेऊन संघटन मजबूत करण्याची जबाबदारी आता सर्वांवर आहे.”
नवनियुक्त शहराध्यक्ष निलेश (बबलू) खैरे यांनी पदग्रहणानंतर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटना अधिक मजबूत करण्यासाठी मी प्रामाणिकपणे कार्य करेन. शहरातील प्रत्येक विभागात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येईल. वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वांच्या सल्ल्याने पक्षाला नवी दिशा देण्याचे काम करण्यात येईल. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस पक्ष नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. नाशिक शहरात काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि युवकांना पक्षाशी जोडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.”
याप्रसंगी खासदार डॉ. शोभाताई बच्छाव म्हणाल्या, “काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. निलेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरात काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढेल, असा मला विश्वास आहे.”
प्रदेश उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे म्हणाले, “संघटनेची उभारणी ही कार्यकर्त्यांच्या बळावर होत असते. नव्या नेतृत्वाला साथ देऊन काँग्रेस विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता सर्वांची आहे.”
ज्येष्ठ नेते शरदराव आहेर म्हणाले, “काँग्रेस पक्षाने अनेक नेतृत्वे घडविली आहेत. निलेश खैरे यांच्यासारख्या तरुण नेतृत्वामुळे संघटनेला नवी ऊर्जा मिळणार आहे.”
ज्येष्ठ नेते डॉ. कैलास कमोद म्हणाले, “आजच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेस पक्ष अधिक सक्षम होण्याची गरज आहे. कार्यकर्त्यांच्या विश्वासावर आणि जनतेच्या प्रश्नांवर लढणारी संघटना म्हणून काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे.”
ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले म्हणाले, “लोकशाही मजबूत करण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष आवश्यक असतो. काँग्रेस पक्षाची वैचारिक भूमिका समाजासाठी महत्त्वपूर्ण असून नव्या नेतृत्वाकडून अपेक्षा वाढल्या आहेत.”
काँग्रेस नेते रईस शेख म्हणाले, “शहरातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन काँग्रेसची ताकद वाढविण्याचे काम करावे. निलेश खैरे यांच्या नेतृत्वाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.”
यावेळी नाशिक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन तानाजी पाटील गायधनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी, मुश्ताक कुरेशी व त्यांच्या समर्थकांनी तसेच आप पक्षाचे कैलास कडलग यांनी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे कार्यक्रमात विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
तसेच पदग्रहण सोहळ्यादरम्यान काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते भल्लाशेठ राठी यांनी काँग्रेस भवनासाठी मोठ्या प्रेमाने आकर्षक लाकडी खुर्ची भेट देऊन पक्षाप्रती आपली निष्ठा व्यक्त केली. उपस्थितांनी त्यांच्या या योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमास प्रदेश काँग्रेस सचिव तथा वैद्यकीय मदत कक्ष प्रदेशाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, जिल्हा (ग्रामीण) काँग्रेस कमिटी उत्तर विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश कहाडोळे, मनपा गटनेते सुफियान जीन, शहर उपाध्यक्ष उल्हास सातभाई, सिराज कोकणी, महिला शहराध्यक्षा स्वाती जाधव, माजी नगरसेविका वत्सलाताई खैरे, डॉ. दिनेश बच्छाव, नगरसेवक जाकिर अत्तार, माजी उपाध्यक्ष दिगंबर गिते, युवक जिल्हाध्यक्ष गौरव पानगव्हाणे, केशव अण्णा पाटील, लक्ष्मण जायभावे, रमेश जाधव, विजय पाटील, उद्धव पवार, बाबा खतीब, साजिद खान, कामिल इनामदार, कुसुमताई चव्हाण, ज्युली डिसूझा, गुड्डी आपा, ज्ञानेश्वर चव्हाण, सुदेश मोरे, गौरव सोनार, मुन्ना ठाकूर, ॲड. सागर वाव्हुळे, अरुण दोंदे, मनोहर अहिरे, अनिल कोठुळे, उमाकांत आप्पा गवळी, संदीप वाघ, संतोष कस्तुरे, उमेश दासवाणी, विनोद देवरे, विजय भोसले, सुनील वैद्य, मोहन शिंदे, प्रकाश कापडणे, दत्ता सोनवणे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओबीसी विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय राऊत यांनी केले. उपस्थितांचे स्वागत उद्धव पवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. भालचंद्र पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मागासवर्गीय विभागाचे ज्ञानेश्वर काळे यांनी केले.
Comments are closed.