NGN News
Latest Marathi News

नाशिकमधील तिसरा वि प सदस्य निवडण्यासाठी आज मतदान

  • एकमेव उमेदवार असल्याने शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांना विजयाची खात्री

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या सदस्यत्वासाठी उद्या गुरुवारी मतदान होणार असून प्रशासकीय पातळीवर त्याची पूर्ण तयारी झाली आहे. दोन वर्षांहून अधिक काळ उशिरा होत असलेल्या या निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्याला तिसरा विधान परिषद सदस्य मिळणार आहे. महायुतीमध्ये अखेरच्या टप्प्यात झालेली दिलजमाई, गोंधळलेले विरोधक आणि लहान पक्षांनी ऐनवेळी महायुतीला दिलेला उघड पाठींबा यामुळे शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांचा विजय सुकर मानला जात आहे.

प्रारंभीच्या नाराजी नाट्यात भाजपचे गणेश गीते आणि प्रसाद हिरे तसेच अपक्ष गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. कालौघात तीनही उमेदवारांनी माघार घेतली असली तरी प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते हे मुदतीनंतर माघारी गेल्याने त्यांची नावे मतपत्रिकेत असणार आहेत. यामुळे दगाफटका होणार नाही, याची महायुती नेतृत्वाकडून पुरेशी काळजी घेतली जात आहे. त्यातही गोकुळ गीते यांची भूमिका संदिग्ध असल्याने महायुती सावध पवित्र्यात आहे.

नगरसेवक ठाणे, भिवंडी मुक्कामी..

दरम्यान, महायुती मतदारांमध्ये फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेसह भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांच्या नगरसेवकांना सहलीसाठी रवाना करण्यात आले आहे. हे नगरसेवक ठाणे आणि भिवंडी येथील रिसोर्ट तसेच हॉटेलवर मुक्कामी आहेत, गुरुवारी ऐनवेळी त्यांना नाशिकला मतदानासाठी आणले जाणार असल्याची माहिती महायुतीच्या सूत्रांनी दिली. विरोधकांमध्ये अंशत: फुट पडली असून मालेगावचे एमआयएम तसेच सुरगाण्याचे माकप आणि इतर काही ठिकाणचे अपक्ष उमेदवार महायुतीच्या सहलीत सामील झाले आहेत.

महायुती निश्चिंत ..

प्रारंभीच्या मानापमान नाट्यानंतर महायुतीत वरिष्ठांच्या आदेशानुसार एकोपा निर्माण झाल्याने आता सत्तादाहारी निश्चिंत झाल्याची माहिती पुढे आली आहे. महायुतीच्या तीन घटक पक्षांमिळून ४६६ नगरसेवकांचे संख्याबळ असून इतर पक्षांच्या पाठींब्यामुळे ते वाढले आहे. परिणामी, महायुतीला विजयाचा अंदाज आल्याचे सांगण्यात येत असून नेते निश्चिंत झाले आहेत.

Comments are closed.