
- शेतकऱ्यांचे ड्रम बजाव आंदोलन; शेतकऱ्यांना ड्रम-कॅनमध्ये डिझेल पुरवठा पूर्ववत सुरू करण्याची मागणी..
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लोहोणेर : पंडीत पाठक
पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीच्या कामात शेतकरी व्यस्त असतानाच पेट्रोल पंपांवर ड्रम व कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. १५) देवळा तहसील कार्यालयावर धडक देत अनोखे ड्रम बजाव आंदोलन केले. रिकामे ड्रम वाजवत आणि जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आंदोलना दरम्यान तहसील कार्यालयात ड्रमच्या आवाजाने आणि घोषणांनी दणाणून गेला.
केंद्र शासनाने ११ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील नव्या निर्देशांमुळे पेट्रोल पंपांवर ड्रम व कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी घालण्यात आल्याचे पेट्रोल पंप चालकांकडून सांगितले जात आहे. या निर्णयाचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत असून ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पॉवर टिलर व इतर कृषी यंत्रसामग्रीसाठी डिझेल उपलब्ध करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सध्या नांगरणी, वखरणी आणि पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असल्याने डिझेलअभावी अनेक शेतकऱ्यांची कामे खोळंबली असून त्यांच्यात तीव्र नाराजी पसरली आहे.
दरम्यान, काही शेतकरी देवळा शहरातील पेट्रोल पंपावर ड्रम घेऊन डिझेल भरण्यासाठी गेले असता कर्मचाऱ्यांनी ड्रममध्ये डिझेल देण्यास नकार दिला. यामुळे खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी रिकामे ड्रम घेऊन तहसील कार्यालयावर दाखल झाले.
शेतकऱ्यांना ड्रम-कॅनमध्ये डिझेल मिळालेच पाहिजे, शेतीच्या कामासाठी डिझेल द्या”, शेतकऱ्यांना न्याय द्या, शासन जागे व्हा अशा घोषणा तहसील कार्यालयात देण्यात आल्या. रिकामे ड्रम वाजवत शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी थेट नायब तहसीलदार कैलास निकम यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या टेबलावर रिकामे ड्रम ठेवले. आम्हाला शेतीच्या कामासाठी डिझेल द्या. अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. रिकामे ड्रम हे शेतकऱ्यांसमोरील इंधन संकटाचे प्रतीक असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. या अनोख्या आंदोलनामुळे तहसील कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधले गेले.
यानंतर नायब तहसीलदार कैलास निकम व पुरवठा अधिकारी शारदा गावंडे यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी पूर्वीप्रमाणे ड्रम व कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घ्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच ॲड. वैभव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, गणेश शेवाळे, सोपान सोनवणे, सतीश शेवाळे, सदाशिव शेवाळे, विनोद मोरे, योगेश मोरे, सौरभ शेवाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
शेतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांना ड्रम व कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. त्यामुळे ड्रम व कॅनमधील डिझेल पुरवठ्याचा प्रश्न आता तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा बनला असून प्रशासन व शासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.