NGN News
Latest Marathi News

विद्रोह विरला, काहूर उरला ! ( सारीपाट / मिलिंद सजगुरे )

** एनजीएन न्यूज नेटवर्क

काहीही झाले तरी निवडणूकीतून माघार न घेण्याची आणि महायुती उमेदवाराला ‘आस्मान’ दाखवण्याची भीष्मप्रतिज्ञा करणाऱ्या गोकुळ गीते यांना अखेर बंडाची तलवार म्यान करावी लागली. विधान परिषद नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतून गीते माघारी फिरले असले तरी तीन कॅबिनेट मंत्र्यांची सलग दोन आठवडे दमछाक करून त्यांना स्वत:च्या घराचे उंबरठे झिजवायला लावण्याची किमया त्यांनी करून दाखवली, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. हे राजकीय संचित त्यांना भविष्यात कामी येते की अडचणीत आणते, हे काळ ठरवणार आहे. तत्राप, निवडणूक विजयासाठी पाशवी बहुमतासह आवश्यक सर्व बाबींचे संपुट हाती असताना महायुती नेत्यांना एका अपक्ष उमेदवारापुढे माघारीसाठी याचना करण्याची वेळ यावी, हे मात्र न उलगडणारे कोडे आहे. गीतेंना माघारीसाठी भाग पाडताना यंत्रणेच्या भात्यातील कारवाईरूपी बाणाचे भय दाखवण्यात आल्याचे सांगण्यात येते. अर्थात, हा बाण गीते यांच्याऐवजी त्यांचे बंधू गणेश गीते यांच्या राजकीय कारकिर्दीचा वेध घेऊ शकणारा असल्यानेच नाईलाजाने का होईना त्यांना मैदानातून माघारी फिरण्याची अपरिहार्यता स्विकारावी लागली.

मूळ कॉंग्रेसी संस्कृतीतील गणेश गीते यांचा भाजपमधील प्रवास तसा स्तिमित करणारा आहे. विशेषत:, खानदेशपुत्र गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक भाजपची धुरा आल्यानंतर गीते यांनी त्यांच्या ‘ब्ल्यू आईड बॉईज’ च्या यादीत केव्हा स्थान मिळवले, ते स्थानिक भाजपेयींनाही उमगले नाही. तब्बल दोनदा महापालिका स्थायी समिती अध्यक्षपद मिळवून गीते राजकीयदृष्ट्या प्रकाशमान झाले. तथापि, गेल्या विधानसभा निवडणूकीत नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यावर भाजपच्या नाकावर टिच्चून ते शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पालखीचे भोई बनले. पण त्यांना आपटी खावी लागली आणि ‘महाजनी’ कृपेने त्यांनी पुन्हा भाजपची वहिवाट धरली. तेव्हा त्यांना म्हणे राजकीय पुनर्वसनाचा शब्द देण्यात आला होता. त्यासाठीचा मुहूर्त आताच्या निवडणूक रूपाने रेटण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्यांच्या (आणि खरेतर गिरीशभाऊ यांच्याही) दुर्दैवाने जागावाटपात नाशिक शिंदेसेनेच्या वाटेला गेले आणि गीते बंधूंच्या नाराजी नाट्याचा अंक सुरू झाला. गणेश गीते यांनी भाजपच्या वतीने तर बंधू गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत शिंदेसेनेचे टेन्शन वाढवले.

कालौघात, गणेश गीते यांनी प्रदेश नेतृत्वाने दबाव टाकताच अखेरच्या दिवशी का होईना माघार घेतली. गोकुळ हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. बंधूंचे नाही तर किमान आपले राजकीय पुनर्वसन करण्याची त्यांची अव्यक्त अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी महायुती उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या अकार्यक्षमतेसह चमत्कृतीजन्य आर्थिक अभ्युदयावर बोट ठेवले. त्यांची सहा वर्षांची कारकिर्द एखाद्या लोकप्रतिनिधीला साजेशी नव्हती, असा घणाघात केला. आमदार परिवारातील युवा नेत्याने आपला ‘पित्रोध्दार’ केल्याचा मुद्दा त्यांनी वारंवार उच्चारून दराडे कुटुंबियांच्या संस्कृतीचे वाभाडे काढले. ही सारी वस्तुस्थिती असली तरी नाशिकच्या जागेबाबत तडजोड होणार नव्हती, याची गीते बंधूंसह गिरीश महाजन यांना कल्पना होती. अखेर गोकुळ गीते यांच्या भीष्मप्रतिज्ञेला सुरूंग लावण्यासाठी थेट मुंबापुरीतून सुत्रे हलली. बंधू गणेश गीते यांचा कथित म्हाडा प्रकरणातील सहभाग, उच्च न्यायालयाने त्यांना मंजूर केलेल्या जामीन रद्दसाठी राज्य शासनाने घेतलेला कायदेशीर सल्ला आणि त्याव्दारे खेळण्यात आलेली खेळी या द्युतामध्ये गीते बंधूंवर दबाव आल्याने त्यांचा खेळ खल्लास झाला.

केवळ थोरल्या बंधूंच्या अडचणीमुळे निवडणूकीतून तांत्रिक माघार घ्यावी लागलेले गोकुळ गीते यांनी महायुती उमेदवाराचा प्रचार करणार की नाही, या मुद्द्यावर बाळगलेले मौन मात्र बरेच काही सांगून गेले. गीते यांच्या अर्जावर सूचक-अनुमोदक म्हणून विरोधी गोटातील नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिवाय, प्रचार अथवा माध्यम संवादात आपल्यासोबत तब्बल साडेतीनशे मतदार असल्याचा ते वारंवार दावा करीत होते. तांत्रिक माघारीनंतरही मतदान प्रक्रियेत मतपत्रिकेत त्यांचे नाव असणार आहे. विरोधी आघाडीकडे उमेदवार नाही, ही वस्तुस्थिती असताना आतापर्यंत तरी त्यांचे १५४ मतदार काय भूमिका घेणार हे स्पष्ट झालेले नाही. ऐनवेळी विरोधक आणि महायुतीतील असंतुष्ट एकवटले तर नाशिकमध्ये चमत्कारिक निकाल लागण्याची शक्यता आहे. हे भयगंड महायुतीला सतावत असल्यानेच आपल्या बाजूने मोठे संख्याबळ असूनही मतदारांना अज्ञातस्थळी नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. उद्या महायुती उमेदवाराविरोधात ‘क्रॉस व्होटिंग’ होऊन विपरित काही घडले तर भाजपच्या दृष्टीने ‘चीत भी मेरी, पट भी मेरी’ अशी स्थिती राहणार आहे. स्वाभाविकच, अगदी निकालाच्या दिवसापर्यंत किमान सामंत-भुसे मंत्रीव्दय टेन्शनमध्ये राहणार, हे नक्की.

निवडणूक जाहीर होण्यापासून ते अगदी गोकुळ गीतेंच्या माघारीपर्यंत झालेल्या हालचालींचा वेध घेतल्यास एक बाब प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे ही प्रक्रिया केवळ गिरीश महाजन, उदय सामंत, दादाजी भुसे या मंत्रीगणांसह गीते बंधूंभोवती फिरत राहिली. तीमध्ये छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ मंत्री, ना महायुतीचे इतर आमदार, ना पदाधिकारी प्रत्यक्षाप्रत्यक्ष सहभागी झाले. केवळ दोन पक्षांतील हा पाच जणांचा हा ‘मेळा’ राज्यभर चर्चेमध्ये राहिला. एका अपक्ष उमेदवाराच्या मनधरणीसाठी राज्याच्या तीन मंत्र्यांना नाशकात खेट्या घालाव्या लागल्या हे मुंबईत एकोप्याच्या गप्पा मारणाऱ्या महायुतीतील विसविशीतपणाचे ज्वलंत उदाहरण ठरावे. तद्वतच भाजपमधील शिस्तीचे पुन्हा तीन-तेरा वाजल्याचा हा अस्सल नमुना ठरला. साडेतीनशे मते खिशात असल्याचा दावा करणाऱ्या गोकुळ गीते यांच्याकडील विरोधकांची दीडशे मते वगळता इतर दोनशे मतांचे संपुट कुठून उभे राहिले किंवा प्रत्यक्ष निवडणूकीत राहणार होते? ज्या गीते बंधूंना गिरीश महाजन हे राजकीय ‘गॉडफादर’ वाटतात, त्याच महाजन यांना माघारीसमयी शिष्याची मनधरणी करण्याची वेळ का यावी ? गीते यांच्या ताठर भूमिकेचे जळगाव निवडणुकीशी कनेक्शन होते का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे केवळ महाजन आणि गीते बंधू जाणोत.

सारांशात, विधान परिषद नाशिक मतदारसंघातील पंधरवड्यातील घटनांनी अवघे राजकीय विश्व ढवळून निघाले. या घडामोडींनी काही स्पष्ट संदेश दिलेत ते म्हणजे यापुढे भाजपशी निगडीत कोणतीही बाब राहो, ती स्थानिकांच्या अखत्यारीत असणार नाही. त्यांनी केवळ मूक दर्शक म्हणून साक्षीला राहायचे. झालेले निर्णय निमुटपणे मान्य करायचे. शिस्त, तत्व आणि पक्षनिष्ठा यांसारख्या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. सत्तेच्या वाटमारीत केवळ विजय महत्वाचा, बाकी सारे झूठ ही मानसिकता तयार करायची. या सर्व कोलाहलात जनता-जनार्दनाच्या भावनांचा यत्किंचितही आदर करण्याचे कारण नाही. भाजपच्या या दिग्विजयी प्रवासात सत्तेतल्या दोन्ही भागीदार पक्षासह जनताही ससेहोलपट अनुभवते आहे, हे मात्र नाकारण्याजोगे नाही, एव्हढेच यानिमित्ताने…

Comments are closed.