NGN News
Latest Marathi News

खरातविरोधात तक्रारी वाढणार; आणखी तीन पीडिता पुढे येणार

  • महिला शोषणाचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याची चर्चा; आर्थिक स्त्रोतांवर आयकर विभागाची वक्रदृष्टी

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांनी पुढे येत तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली असून, तपास यंत्रणांना महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. खरातने महिलांचे शोषण केल्याचे 100 हून अधिक व्हिडिओ असल्याची माहिती देखील समोर आली आहे.  

सूत्रांच्या माहितीनुसार, या तिन्ही महिलांना विश्वासात घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे. विशेष तपास पथक (SIT) या महिलांचे जबाब अत्यंत संवेदनशीलतेने नोंदवत असून, या नव्या साक्षींमुळे खरातविरोधातील पुरावे अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणात महिला शोषणासोबतच आर्थिक गैरव्यवहारांचाही तपास सुरू झाला आहे. आयकर विभागाने खरातच्या मालमत्ता, व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी केली जाणार आहे. नाशिकसह विविध ठिकाणी असलेल्या मालमत्तांचा तपशील गोळा केला जात असून, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची छाननी केली जाणार आहे.

52 सातबारा नोंदी

दरम्यान, अशोक खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर सुमारे 52 सातबारा नोंदी असल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. काही सामायिक जमिनींमध्ये सरकारी अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची नावे असल्याचाही संशय तपासात व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या व्यवहारांच्या ‘लिंकिंग’द्वारे मोठे आर्थिक जाळे उघड होण्याची शक्यता आहे. याशिवाय, बँक व्यवहार, रोख रकमेची हालचाल, देणगीदार, भागीदार आणि आर्थिक मदत करणारे व्यक्ती यांनाही तपासाच्या कक्षेत आणले जात आहे. ग्राहकांकडून घेतलेल्या फीच्या पावत्यांचीही पडताळणी केली जाणार असल्याने, खरातच्या संपूर्ण आर्थिक व्यवहारांचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.