NGN News
Latest Marathi News

महिला कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढण्याची संतापजनक ‘मोडस ऑपरंडी’

  • एकीला सुटीच्या दिवशी रिसॉर्टवर नेऊन अत्याचार; मुलाखतीपासूनच लक्ष्य करण्याची पद्धत

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नोकरीचे आमिष दाखवून आणि नंतर उपकृत झाल्याच्या बदल्यात महिला कर्मचाऱ्यांना जाळ्यात ओढण्याची ‘मोडस ऑपरंडी’ नाशिकमधील बहुचर्चित आयटी कंपनीत विकसित करण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. अशाच एका महिला कर्मचाऱ्याला सुटीच्या दिवशी एका रिसॉर्टवर नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा संशयित आरोपींना अटक केली असून कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

बहुराष्ट्रीय स्वरूप असलेल्या या कंपनीत घडलेल्या प्रकाराने शहरभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. कामाच्या ठिकाणी महिलांच्या अवयवांकडे पाहून अश्लील हावभाव करणे आणि त्यांच्या धर्माबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणे, असे प्रकार तिथे सुरू होते. केवळ महिलाच नव्हे, तर कार्यरत एका तरुण कर्मचाऱ्याला देखील धर्मांतरासाठी भाग पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तपासात समोर आला आहे. यासंदर्भात गेल्या 25 मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर, 2 आणि 3 एप्रिल रोजी मुंबई नाका पोलीस ठाण्यात आणखी 8 गुन्हे नोंदवण्यात आले. पोलिसांनी आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार या सहा संशयितांना नाशिकमधून अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नोकरीच्या मुलाखतीपासूनच महिलांना लक्ष्य करण्याची ही पद्धत अत्यंत गंभीर असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. आतापर्यंत आठ महिला कर्मचारी संशयितांच्या अत्याचाराच्या बळी ठरल्या असून या रॅकेटमध्ये आणखी किती जणांचा समावेश आहे आणि किती महिला या शोषणाला बळी पडल्या आहेत, याचा कसून तपास सुरु आहे.

तक्रारकर्त्या १८ ते २५ वयोगटातील ..

सहा संशयितांनी लैंगिक अत्याचारासोबत मानसिक शोषण आणि धार्मिक भावनांशी खेळण्याचा संतापजनक प्रकार केला. तक्रार करणाऱ्या महिला १८ ते २५ वयोगटातील आहेत. नमाज पठाण करण्यासाठी सक्ती करणे, बीफ खाण्यास भाग पाडणे, धर्मांतर करण्यास दबाव टाकणे आदी गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. यामध्ये ‘एचआर’ विभागात कार्यरत एक महिला अधिकारी संशयिताना मदत करत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. सदर महिला फरार असल्याचेही सांगण्यात येत आहे. आतापर्यंत पोलिसांनी धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आणि अत्याचाराचे गुन्हे नोंदवले आहेत. यापैकी देवळाली पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

आर्थिक विवंचना हेरून जाळे टाकण्याचे पाप

नोकरीनिमित्त मुलाखती घेताना संशयित महिलांची कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटुंबाची कमाई आणि तत्सम माहिती काढून घेत. आर्थिक विवंचना असलेल्या महिला कर्मचाऱ्यांना हेरून त्यांना सावज बनवण्याचा कुटील डाव ते खेळत होते. नोकरीची गरज आणि ती आपण कशी मिळवून दिली, हे महिलांवर बिंबवून संशयित त्यांच्यावर वैविध्यपूर्ण अत्याचार करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेवून एसआयटी स्थापन करण्यात आली असून योग्य दिशेने तपास सुरु झाल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त ( गुन्हे ) संदीप मिटके यांनी दिली.

‘ तिने’ महिनाभर ‘रोजे’ ठेवले आणि भांडाफोड

दरम्यान, या प्रकाराची माहिती एका मध्यमवर्गीय कुटुंबातून समोर आली. जुलै 2022 पासून कंपनीत नोकरी करणाऱ्या एका आधुनिक तरुणीच्या वागण्यात अचानक बदल दिसू लागला. जीन्स-टॉप घालणारी ही मुलगी अचानक पंजाबी ड्रेस घालू लागली. धक्कादायक बाब म्हणजे सलग महिनाभर ‘रोजे’ ठेवल्याचे पाहून कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, कंपनीत चाललेल्या लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रयत्नांची संतापजनक माहिती समोर आली.

Comments are closed.