NGN News
Latest Marathi News

मृत्यूची भीती घालून खरातकडून जमीनीची नाममात्र दरात खरेदी

  • भोंदूबाबाचा नवा प्रताप उघड; सिन्नर पोलीस ठाण्यात १४ वा गुन्हा दाखल

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : तुमची १६ एकर जमीन अपशकुनी असल्याने जर ती विकली नाही, तर कुटुंबातील चार भावांपैकी एकाचा मृत्यू होईल, अशी भीती घालून सुपीक जमीन अत्यंत नाममात्र दरात खरेदी करण्याचा अशोक खरात याचा नवा प्रताप उघड झाला आहे. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील याच जमिन व्यवहाराप्रकरणी खरात याच्याविरुध्द १४ वा गुन्हा दाखल झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अशोक खरात आणि कल्पना खरात यांनी मिरगाव येथील माळी कुटुंबातील चार भावांवर आपल्या तथाकथित आध्यात्मिक शक्तीचा पगडा निर्माण केला होता. तुमच्या घरावर मोठे संकट आहे, असे सांगून त्याने या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्याने आपला खरा डाव टाकला. त्याने या भावांना सांगितले की, त्यांच्या मालकीची १६ एकर जमीन ही त्यांच्यासाठी अपशकुनी आहे. जर त्यांनी ही जमीन विकली नाही, तर कुटुंबातील चार भावांपैकी एकाचा मृत्यू होईल, अशी भीती घातली. मृत्यूच्या भीतीपोटी हवालदिल झालेल्या माळी बंधूंनी आपल्या भावाचा जीव वाचवण्यासाठी ती जमीन विकण्याचा निर्णय घेतला. याचाच फायदा घेत खरातने कोट्यवधी रुपये बाजारमूल्य असलेली ही सुपीक जमीन अत्यंत नाममात्र दरात स्वतःच्या नावावर करून घेतली. आपली पिढ्यानपिढ्यांची जमीन गेल्यानंतर हे कुटुंब उघड्यावर आले. तर दुसरीकडे खरातने त्याच जमिनीवर आपले साम्राज्य उभे केले.

ईशानेश्वर मंदिर, फार्म हाऊस बांधणी

हडपलेल्या जमिनीवर खरात याने ईशानेश्वर मंदिर उभारले, जेणेकरून तो पुन्हा भाविकांना आकर्षित करून आपली भोंदूगिरी सुरू ठेवू शकेल. त्याच परिसरात त्याने स्वतःसाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असे भव्य फार्म हाऊस बांधले. यानंतर माळी बंधूंना जेव्हा आपली फसवणूक झाल्याचे आणि खरातने केवळ भीती दाखवून जमीन लाटल्याचे उमजले, तेव्हा त्यांनी सिन्नर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत अशोक खरात आणि कल्पना खरात यांच्यावर गुन्हा नोंदवला

Comments are closed.