NGN News
Latest Marathi News

‘टीसीएस’ च्या वरिष्ठ पथकाकडून कंपनीची ‘झाडाझडती’

  • १५० कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ चे आदेश; राष्ट्रीय महिला आयोगाकडून प्रकारची दखल

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : शहरातील नामांकित टीसीएस कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याची गंभीर दखल कंपनीच्या नवी दिल्लीतील मुख्य कार्यालयाने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीचे वरिष्ठ पथक नाशकात दाखल झाले आहे. पथकाकडून कंपनीची ‘झाडाझडती’ सुरू आहे. तपासाच्या काळात कामकाजात अडथळा येऊ नये आणि कर्मचारी सुरक्षेसाठी १५० कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ कामकाज करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एसआयटी तपासातील माहितीनुसार, निदा खान ही परिचालन विभागात व्यवस्थापक आणि टीम लीडर म्हणून कार्यरत होती. दररोजच्या कामाच्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींना लक्ष्य केले जात असे. कामाचे नियोजन देण्याच्या बहाण्याने मुलींवर धर्मांतरासाठी दबाव टाकला जात असे. ज्या महिलांनी विरोध केला, त्यांचा मानसिक आणि लैंगिक छळ करण्यासाठी निदा खान चिथावणी देत असल्याचे तपासात उघड झाले आहे. हे सर्व कृत्य एका विशिष्ट व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून हाताळले जात होते, ज्यामुळे यात आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा संशय बळावला आहे. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे, ज्यात कंपनीची एचआर अश्विनी चैनानी हिचाही समावेश आहे. अश्विनीच्या चौकशीतूनच निदा खानच्या मुख्य भूमिकेचा खुलासा झाला आहे. निदा खानच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी

दरम्यान, कंपनीतील प्रकारानंतर कामगार उपायुक्त कार्यालयाचे पथक जेव्हा चौकशीसाठी पोहोचले, तेव्हा त्यांना तेथे एकही कर्मचारी आढळला नाही. प्रशासनाने शॉप ॲक्ट लायसन्स आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. अंतर्गत चौकशीत कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले जात असून, त्यात अनेक गंभीर तक्रारी समोर आल्याची माहिती समोर आली आहे.

महिला आयोग टीम धडकणार

या प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाची टीम १८ एप्रिल रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहे. ही टीम पीडित महिलांशी संवाद साधून प्रकरणाची सविस्तर पाहणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Comments are closed.