NGN News
Latest Marathi News

श्री स्वामी समर्थ सेवामार्गांतर्गत नदी स्वच्छता, जल संवर्धन अभियान

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गांतर्गत कार्यरत असलेल्या पर्यावरण, प्रकृती विभागाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या नदी स्वच्छता, पूजन, आणि जलसंवर्धन पंधरावाडा अभियाना अंतर्गत महाराष्ट्र व देशभरातील 1100 ठिकाणी त्या त्या भागातील नदीवर जाऊन हजारो आबालवृद्ध सेवेकरी स्वच्छता, नदीपूजन करून जलसंवर्धनाचे महत्व समजावून सांगत आहेत.दिंडोरी येथील धामण नदीवर आबासाहेब मोरे यांचे उपस्थितीत या अभियानाचा प्रारंभ झाला.या नदी किनारी पुरातन श्रीरामेश्वर मंदिर आहे. अभियानात सहभागी झालेल्या प्रतिनिधींनी मंदिराची साफसफाई केली. सदर अभियानात दिंडोरी येथील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी सहभागी झाले.

या अभियानात त्या त्या गावा खेड्यातील सेवेकरी, ग्रामस्थ, नागरिक नदी व परिसर स्वच्छता, नदीचे पूजन व मानसन्मान, सामूहिक पर्जन्य सुक्त पठण, जलसंवर्धन प्रतिज्ञा, प्रबोधन इत्यादी उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. नदी परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी सेवा केंद्र व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

दिंडोरी येथील कार्यक्रमात आबासाहेब मोरे यांनी स्वच्छता अभियानासाठी उपस्थित पर्यावरण प्रेमींना नदी स्वच्छतेचे महत्त्व सांगून जल संवर्धन संदर्भाबाबत प्रबोधन केले. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी, इंधन बचत करण्यासाठी व उत्तम आरोग्यासाठी दिंडोरी सायकल असोशिएशनची सुरुवात करून शक्य असेल त्या ठिकाणी सायकल वापरण्यास सुरुवात करावी, असे आवाहन आदरणीय आबासाहेब मोरे यांनी केले.
त्यानंतर सर्वांनी मिळून जल संवर्धन प्रतिज्ञा घेतली. प्रार्थनेने अभियानाची सांगता झाली.

Comments are closed.