
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, विचारवंत आणि लाखो लोकांना मानसिक बळ देणारे डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयपीएच माईंडलॅब, नाशिक यांच्या वतीने शुक्रवारी शंकराचार्य न्यासाच्या कृतकोटी हॉल येथे भावांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाशिककरांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात डॉ. नाडकर्णी यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची सुरुवात वैद्येही भिडे यांनी डॉ. आनंद नाडकर्णी लिखित प्रार्थनेने केली. त्यानंतर “मनतरंग”च्या माध्यमातून भावना ओळखणे, त्यांचे व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉ. नाडकर्णी यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपट प्रदर्शित करण्यात आला.
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यासोबतचे विविध अनुभव आणि आनंदाचे क्षण अनेक मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. डॉ. नाडकर्णी हे केवळ प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ नव्हते, तर ते संवेदनशील कवी, उत्तम चित्रकार, नाटककार आणि संगीताची गाढ जाण असलेले बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते, अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले.
यावेळी वंदना आत्रे, डॉ. शिरीष सुळे, डॉ. भरत केळकर, शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी, विवेक कुलकर्णी, डॉ. शिल्पा देशपांडे, अमोल कुलकर्णी, विनोदिनी काळगी यांच्यासह नाशिकमधील अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, डॉ. नाडकर्णी यांच्या उपचारातून मानसिक आधार मिळालेल्या काही रुग्णांनीही आपल्या भावना व्यक्त करत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी नाशिकमधील विविध क्षेत्रांतील मान्यवर, नागरिक आणि मानसिक आरोग्य क्षेत्राशी संबंधित अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी डॉ. ओमकार जोशी यांनी आनंद नाडकर्णी यांना लिहिलेले पत्र वाचन झाले. कार्यक्रमाचा समारोप शांतिमय प्रार्थनेने करण्यात आला.
तसेच, दरवर्षी मे महिन्यात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मानसिक आरोग्य या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
Comments are closed.