NGN News
Latest Marathi News

नाशिकमधील बडे बिल्डर्स संकटात; ‘एमपीआयडी’अंतर्गत गुन्हा

  • एनए प्लॉट नावाखाली गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक; बांधकाम व्यवसायाला हादरा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : एनए प्लॉट बनवून देण्याचे आणि विक्रीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी शहरातील नामांकित बिल्डर्स आणि विकासकांविरुद्ध एमपीआयडी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यभर गाजलेल्या म्हाडा घोटाळ्यात अनेक बिल्डर्स आणि विकासकांवर कारवाईची टांगती तलवार कायम असताना शहराच्या बांधकाम व्यवसायाला हादरा देणारा हा नवा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी अॅड. हेमंत सुरेश सातभाई यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित जितेंद्र मनोहरदास ठक्कर, काश्मिरा राजेंद्र शहा, अनघा यशवंत गुजर, बाबूलाल मणिलाल शहा, राजेश बाबूलाल शहा, रोहित मणिलाल शहा, सुरेंद्र मणिलाल शहा, अश्विन गोवर्धनदास जसपरा, राजेंद्र रसिकलाल शहा हे बिल्डर्स आणि त्यांच्या शुभशनी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. संस्थेच्या शरद कुटे व भास्कर आनंदराव पवार अशा एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकरण मखमलाबाद शिवारातील जुन्या सर्व्हे नंबर ३८८+३८९ मधील वकीलनगर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीच्या नियोजित ले-आउट संबंधित आहे.

संगनमत करून कट रचला

अॅड. सातभाई यांनी १९९८ मध्ये या सोसायटीचे सभासदत्व घेतले होते. संशयित बिल्डर्सच्या शुभशनी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीने एन. प्लॉट विकसित करून देण्याचे आमिष दाखवले होते. यानंतर सातभाई यांनी प्लॉट नंबर १२५ (क्षेत्रफळ ३६० चौरस वार) साठी संपूर्ण रक्कम भरली आणि त्यांना लेटर ऑफ अलॉटमेंटदेखील देण्यात आले. परंतु, संशयितांनी कायदेशीर खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केली. गंभीर बाब म्हणजे, आर्थिक फायद्यासाठी संशयित बिल्डर्स आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून कट रचला आणि २४ डिसेंबर २०२० रोजी बनावट खरेदीखताद्वारे हाच प्लॉट तिसऱ्याच नावाच्या व्यक्तीला परस्पर विकून टाकला. अशाचप्रकारे इतरही अनेक सभासदांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या नव्या गुन्ह्याची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता, अटक टाळण्यासाठी या प्रकरणातील काही बड्या संशयितांनी घाईघाईने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतल्याचे समजते. 

Comments are closed.