NGN News
Latest Marathi News

विधान परिषद जागेसाठी रस्सीखेच; दोन महिला चेहरे चर्चेत

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तेच्या खुर्चीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. संख्याबळ महायुतीकडे असले तरी उमेदवारीवरून तिन्ही पक्षांमध्ये सुरू असलेली अदृश्य कुरघोडी आता उघडपणे दिसू लागली आहे. जागा जिंकायची की आपला माणूस बसवायचा, यावरूनच पडद्यामागे राजकीय डावपेच रंगत आहेत.

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकूण ६१९ मतदार आहेत. त्यापैकी तब्बल ४६६ सदस्य महायुतीच्या ताब्यात आहेत. भाजपकडे १८८, शिंदेसेनेकडे १७१, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे १०७ सदस्य आहेत. त्यामुळे ही जागा महायुती सहज जिंकेल, असे चित्र वरवर दिसत असले तरी खरी लढाई विरोधकांशी नसून महायुतीतील अंतर्गत स्पर्धेशी असल्याचे स्पष्ट होत आहे.

यावेळी अंजुम कांदे आणि सोनिया होळकर या दोन महिला चेहऱ्यांची विशेष चर्चा सुरू आहे. नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे यांनी गेल्या काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांशी संपर्क वाढवत जोरदार फिल्डिंग लावली आहे. शिंदेसेनेकडून त्यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. दुसरीकडे लासलगावच्या उद्योजिका सोनिया होळकर यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने राजकीय समीकरणांना वेग आला आहे.

सोनिया होळकर या माजी मंत्री मदन पाटील यांच्या कन्या असून त्यांच्या मातोश्री सध्या भाजपमध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतून त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. वरच्या पातळीवरून राजकीय वजन वापरत तिकिटासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या गाठीभेटी वाढवल्या आहेत. मात्र त्या नेमक्या कोणत्या पक्षाकडून मैदानात उतरणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे त्यांच्या नावाभोवती उत्सुकतेबरोबरच संभ्रमही वाढला आहे.

दरम्यान, भाजपमध्येही अंतर्गत स्पर्धा कमी नाही. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे गणेश गीते आणि महापालिकेची धुरा सांभाळणारे निलेश बोरा या दोघांची नावे जोरात चर्चेत आहेत. भाजपकडून यापैकी कुणाला हिरवा कंदील मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर शिंदेसेनेकडून अंजुम कांदे आणि नरेंद्र दराडे यांची नावे चर्चेत आहेत.

महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नसल्याने प्रत्येक पक्ष आपला उमेदवार रेटण्यासाठी जोर लावत आहे. वरून एकजूट दाखवणाऱ्या महायुतीत आतून मात्र ‘माझाच उमेदवार’ ही स्पर्धा चांगलीच पेटली आहे. त्यामुळे नाशिकची ही निवडणूक विरोधकांविरोधातील नसून महायुतीतील प्रतिष्ठेची लढत ठरणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

Comments are closed.