
- ठाणे महानगरपालिकेतील लिपिक महिलेबाबत कारनामा उघड
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : आपल्या काळ्या कारनाम्यांमुळे जेलवारी सुरु असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या आणखी एका कृत्याची उकल झाली आहे. खरात याच्या प्रभावाखाली असलेल्या ठाणे महानगरपालिकेतील वादग्रस्त अधिकारी महेश आहेर याने पालिकेतील एका महिलेवर अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. लिपिक पदावरील या महिलेला आहेर याने खरातच्या जाळ्यात ओढल्याचे यानिमित्त स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी कासारवडवली ( ठाणे ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आहेर याने अशोक खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात नेऊन तिथे त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध अहेर आणि खरात या दोघांनी तिच्यावरून लिंबू उतरवून अघोरी कृत्य केले. इतकेच नाही तर तिला ‘मोती’ हा खडा घालण्यास सक्ती केली. दैवी शक्तीच्या नावाखाली या महिलेवर मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर आहेर याने तिला कोल्ड्रिंकमध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यावर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. या कृत्याचा व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली. या ब्लॅकमेलिंगच्या जोरावर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. एका भोंदू बाबासोबत मिळून महिलेचे शोषण केल्याचा आरोप झाल्याने अहेरच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.