
- ‘एसआयटी’ अलर्ट : आर्थिक हितसंबंध, संशयास्पद जमीन व्यवहार उघड होण्याची शक्यता
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : महिलांचे लैंगिक शोषण आणि आर्थिक घोटाळे प्रकरणी कारावासात असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास सुरु असताना एक महत्वपूर्ण घडामोड घडली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने आपला मोर्चा आता खरातशी संबंधित असलेल्या बड्या व्यक्तींकडे वळवला आहे. याच अनुषंगाने मंगळवारी शहरातील एका प्रसिध्द हॉटेल व्यावसायिकाला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले होते.
नाशिक शहराच्या मध्यवस्तीत अलिशान हॉटेल चालवणाऱ्या आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्या संबंधित व्यक्तीची तब्बल ६ तास चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या चौकशीत खरात आणि व्यावसायिकामधील आर्थिक हितसंबंध, संशयास्पद जमीन व्यवहार आणि मोठ्या रकमांची देवाणघेवाण यावर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या प्रक्रियेनंतर संबंधित व्यावसायिकाला सोडण्यात आले असले, तरी यातून मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. अजून कोणते बडे चेहरे चौकशीच्या परिघात येतात का, याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहणार आहे.
खरातची प्रकृती खालावली
दरम्यान, एसआयटीकडून खरातची सखोल चौकशी सुरू असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. मळमळ, उलट्या आणि तीव्र डोकेदुखीच्या त्रासासोबत छातीत दुखत असल्याची तक्रार त्याने केली. यानंतर तातडीने कार्डियाक ॲम्बुलन्स बोलवण्यात येऊन खबरदारीचा उपाय म्हणून त्याला काही काळ ऑक्सिजनवरही ठेवण्यात आले होते. डॉक्टरांच्या पथकाने त्याची प्राथमिक तपासणी केली. खरातच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. दोन दिवसांपूर्वीच त्याच्या वकिलांनी खरातला न्यूरोलॉजिकल समस्या असल्याने न्यूरोसर्जनकडे नेण्याची मागणी न्यायालयात केली होती. यानंतर अचानक त्याची प्रकृती खालवली.
Comments are closed.