
टीसीएस प्रकरण : धर्मांतर कागदपत्रांतील काही बाबी मालेगावशी संबंधित
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : टीसीएस कंपनीतील लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, धर्मांतर कागदपत्रांतील काही बाबी मालेगाव शहराशी संबंधित असून संशयितांनी पिडीत तरुणीचे नाव हनिया असे ठेवले होते. एव्हढेच नव्हे तर पिडीतेची मलेशियाला रवानगी करायचे नियोजन होते. या प्रकरणातील संशयित निदा खान हिच्या जामीन अर्जावर सोमवारी नाशिक रोड न्यायालयात झालेल्या सुनावणीत या नव्या मुद्द्याची उकल झाली.
पिडीतेने धर्मपरिवर्तन करावे, यासाठी तिच्यावर प्रचंड दबाव टाकण्यात आला. शिवाय, तिला होणाऱ्या परिणामांची भीती दाखवण्यात आली, असा युक्तिवाद विशेष सरकारी अभियोक्ता अजय मिसर यांनी न्यायालयात केला. पीडिता आणि संशयितांची झालेली ओळख, तिच्या मोबाईल संचात धर्म परिवर्तनाशी संबंधित रील्स टाकणे, तिला रोजा धरायला लावणे, हिजाब कसा वापरावा याबाबत तिला संश्यीतेच्या घरी प्रशिक्षण देणे आदी बाबींवर प्रकाश टाकताना अजय मिसर यांनी, संशयितांनी पिडीतेचे नाव हनिया असे ठेवत टी विवाहित असल्याचे लक्षात आल्याने तिला मलेशियाला पाठवण्याचे नियोजन केले होते, अशी माहिती दिली.
निदाच्या मोबाईलची तपासणी व्हावी
मालेगाव शहरात धर्म परिवर्तनाच्या अनुषंगाने कागदपत्रांशी संबंधित काही लिंक्स सक्रीय असल्याचे सांगताना विशेष सरकारी अभियोक्ता यांनी त्यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता व्यक्त केली. संशयित निदा खान हिच्या मोबाईलमध्ये अनेक बाबी दडल्या असून न्याय वैद्यक प्रयोगशाळेकडून त्यांचे विश्लेषण झाल्यास आणखी काही धक्कादायक बाबींचा उलगडा होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. निदाचे वकील राहुल कासलीवाल यांचाही यावेळी युक्तिवाद झाला. एकाच कंपनीत एकसारख्या नऊ घटनांसाठी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याऐवजी एकाच गुन्हा दाखल करून तपास करणे शक्य असल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात न धर्मांतरविरोधी कायदा आहे, ना भारतीय न्याय संहितेत तसे कलम. मग सरकारी पक्ष करीत असलेले आरोप कोणत्या कलमाखाली येतात, अशी पृच्छा त्यांनी केली. दरम्यान, निदा खान हिच्या जामीन अर्जावर आता 2 मे रोजी सुनावणी होणार आहे.
Comments are closed.