NGN News
Latest Marathi News

‘युनिगॅदर’ने केला घात; संशयिताकडून महिलेवर अत्याचार

  • नाशकात ३३ वर्षीय संशयित सिद्धार्थ पवारवर गुन्हा दाखल

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : इन्स्टाग्रामवरून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका नराधमाने पीडितेवर अत्याचार केल्याची घटना शहरात उघडकीस आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणींचे जाळे विणणाऱ्या ‘युनिगॅदर’ समुदायाचा या नराधमाने आधार घेत पीडितेवर नाशिक आणि मुंबईत अत्याचार केले. याप्रकरणी संशयित सिद्धार्थ पवार (रा. इंदिरानगर, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार,  बोरिवली ( मुंबई ) परिसरातील रहिवासी असलेल्या महिलेने इन्स्टाग्रामवरील ‘युनिगॅदर’ या पेजला फॉलो केले होते. हा समुदाय अनोळखी व्यक्तींना एकत्र आणून त्यांच्या भेटीगाठी आणि सहलींचे आयोजन करतो. ग्रुपने आयोजित केलेल्या एका गेट-टुगेदर दरम्यान संशयित सिद्धार्थ याने पीडितेचा मोबाईल क्रमांक मिळवला. प्रारंभी मैत्रीच्या नात्याने संवाद साधून सिद्धार्थने पीडितेवर जवळीक साधण्यात यश मिळवले. सिद्धार्थने पीडितेचा विश्वास संपादन करून प्रत्यक्ष भेटी वाढवल्या. गेल्या ५ ते २५ एप्रिल दरम्यान त्याने तिला गुंगीकारक पेय पाजले आणि बेशुद्धावस्थेत असताना तिच्यावर अत्याचार केले. पीडितेने प्रतिकार केला असता तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. शिवाय, पोलिसांत तक्रार केली तर गाडीखाली चिरडून जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने मुंबईतील दहिसर पालीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. तथापि, घटना नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने, कायदेशीर प्रक्रियेनुसार हा गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस सिद्धार्थच्या शोधात आहेत.  

Comments are closed.