NGN News
Latest Marathi News

महापालिका शिक्षिकेचे ‘मिशन मोबाईलमुक्ती’; गावात रंगवल्या ज्ञानाच्या भिंती

  • आनंदवली येथील उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांच्या उपक्रमाचे कौतुक

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : महानगरपालिका शाळा क्रमांक १८, आनंदवली येथील उपक्रमशील शिक्षिका कुंदा बच्छाव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक आगळावेगळा आणि स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. नाविन्यपूर्ण अध्यापनपद्धतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या बच्छाव ह्या नेहमीच विद्यार्थ्यांना पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांनी आजवर राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

याच ध्येयातून ‘मिशन मोबाईलमुक्ती’ हा अभिनव उपक्रम त्यांनी साकारला. मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांचा वाढणारा मोबाईल वापर आणि स्क्रीन टाइम याबद्दलची चिंता लक्षात घेऊन त्यांनी एक अनोखा उपाय शोधला—विद्यार्थ्यांच्या घरांच्या भिंतीच ज्ञानरंगांनी सजवणे !

आनंदवली गाव व संत कबीर नगर परिसरातील विद्यार्थ्यांच्या घरांच्या भिंतींवर त्यांनी रंगीत, आकर्षक आणि बौद्धिक उत्तेजना देणारी कोडी, गणिती संकल्पना, इंग्रजी शब्दसंग्रह, चित्रे अशा विविध शैक्षणिक घटकांचे सुंदर चित्रण केले. या कार्यात त्यांना शाळेतील कलाशिक्षिका सोनाली गांगुर्डे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या ‘ज्ञानभिंतीं’मुळे आता परिसरातील मुले मोबाईलपासून दूर राहून घराबाहेर पडतात, भिंतीवरील कोडी सोडवतात, नवे शब्द शिकतात आणि खेळता खेळता अभ्यास करतात. भारतातील राज्य, महाराष्ट्रातील जिल्हे, ऋतूंची नावे, गणितातील सोप्या युक्त्या,
पाढे लिहिण्याच्या सोप्या पद्धती, वाक्यांवर आधारित कोडी अशा विविध विषयांचा समावेश या उपक्रमात करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, केवळ विद्यार्थीच नव्हे तर रस्त्याने ये-जा करणारे नागरिक आणि पालकही या भिंतींसमोर थांबून उत्सुकतेने वाचन करतात. शिक्षणाचा हा आनंददायी आणि सर्वसमावेशक अनुभव सर्वांनाच भावतो आहे. पालकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असून, विद्यार्थ्यांचा स्क्रीन टाइम कमी होऊन त्यांच्या ज्ञानात भर पडेल, याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता जाधव तसेच मनपा प्रशासनाधिकारी डॉ. मीता चौधरी यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून शिक्षिका बच्छाव यांचे अभिनंदन केले आहे. ज्ञानाच्या रंगांनी सजलेल्या या भिंती केवळ भिंती नाहीत, तर त्या आहेत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने उभे राहिलेले प्रेरणादायी दीपस्तंभच ठरले आहेत.

Comments are closed.