
- स्व. प्रतापराव वाढणे स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत प्रतिपादन
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : एकता ज्येष्ठ नागरिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्व. प्रतापराव वाढणे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत माजी आयपीएस अधिकारी तथा ‘तुरुंगरंग’ पुस्तकाचे लेखक ॲड. रविंद्रनाथ पाटील यांनी “तुरुंगातील दिवसांच्या गोष्टी” या विषयावर अनुभव कथन केले.
येरवडा कारागृहात पहिल्यांदा प्रवेश करताना गदिमांच्या “जग हे बंदिशाळा, कुणी न येथे भला चांगला…” या ओळी आठवल्याचे सांगत त्यांनी तुरुंगातील वास्तव उलगडले. “आपल्याला कधी तुरुंगवास भोगावा लागेल, अशी शक्यताही मनाला शिवली नव्हती. मात्र परिस्थितीमुळे त्या विश्वात जावे लागले,” असे ते म्हणाले. तुरुंगातील कैद्यांच्या भावना, त्यांच्या अपेक्षा आणि मानसिकता यांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, “कैद्यांच्या सर्व समस्या सोडवणे शक्य नव्हते, मात्र त्यांच्या मनात प्रवेश करता आला. त्यातूनच ‘तुरुंगरंग’ हे पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.”
सुमारे दीड तास चाललेल्या व्याख्यानात त्यांनी तुरुंगातील विविध अनुभव मांडले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही त्यांनी समर्पक व सोप्या भाषेत उत्तरे दिली. मंडळाच्या अध्यक्षा अहिल्याताई वाढणे यांच्या हस्ते ॲड. पाटील यांचा सन्मान करण्यात आला. मंडळाचे सचिव सुधाकर भोई यांनी स्वागत केले. लेखक व समीक्षक शैलेश पाटोळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जोशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नंदिनी पगार यांनी केले.
यावेळी राजेंद्र वाघमारे, जयंत बाबरेकर, देवकिसन व्यास, शोभा भुसाळ, घावटे, लोहारकर यांच्यासह मंडळाचे सभासद व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Comments are closed.