NGN News
Latest Marathi News

टीसीएस प्रकरण : निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ‘हा’ निर्णय

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक रोड : टीसीएस नाशिक युनिटमधील कथित लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक न्यायालयाने आज फेटाळला. सरकारी पक्षाने तिच्या कोठडीतील चौकशीची आवश्यकता असल्याचे न्यायालयात ठामपणे मांडले.

‘गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून निदा खान ही मुख्य आरोपींपैकी एक आहे. त्यामुळे तिची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. न्यायालयाने आज तिचा जामीन अर्ज फेटाळला असून सविस्तर आदेश लवकरच अपलोड केला जाईल,’ अशी माहिती सरकारी वकील अजय मिसर यांनी माध्यम संवादात दिली.

एफआयआरनुसार, निदा खान हिने महिला कर्मचाऱ्यांना इस्लामिक परंपरेनुसार वेशभूषा आणि वर्तन करण्याचा सल्ला दिल्याचा आरोप आहे. निदा खान हिने गर्भवती असल्याचे कारण देत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. दरम्यान, पोलिसांकडून महाराष्ट्रातील विविध भागांत तिचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

टीसीएसच्या नाशिक युनिटमधील काही महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळाच्या आणि जबरदस्ती धर्मांतराच्या कथित प्रकरणांमध्ये नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले असून एका महिला ऑपरेशन्स मॅनेजरसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

Comments are closed.