NGN News
Latest Marathi News

लासलगावमधील व्यापारी सुरेशचंद नहाटा यांचे मरणोत्तर नेत्रदान

** एनजीएन न्यूज नेटवर्क

लासलगाव : राकेश बोरा

येथील प्रख्यात व्यापारी सुरेशचंद जवानमल नहाटा (वय ६७) यांचे गेल्या ३० एप्रिल रोजी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनानंतर नहाटा कुटुंबीयांनी अत्यंत उदात्त भूमिका घेत नेत्रदानाचा निर्णय घेतला. लासलगावमधील हे पहिले नेत्रदान यशस्वीरीत्या पार पडले.

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आनंद आबड यांनी तत्काळ डॉ. राजेंद्र भावसार यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर डॉ. भावसार यांनी नाशिक येथील ख्यातनाम नेत्रशल्यचिकित्सक डॉ. शरद पाटील यांच्या ‘सुशील नेत्रपेढी’शी समन्वय साधला. या तातडीच्या हालचालीमुळे नाशिकहून नेत्रपेढीची वैद्यकीय टीम अवघ्या एका तासात लासलगाव येथे दाखल झाली.

तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रदानाची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या नेत्रदानामुळे दोन गरजू रुग्णांना दृष्टीदानाचा लाभ मिळणार असून, त्यांच्या जीवनात नवी उजळणी होणार आहे. या कार्यात डॉ. राजेंद्र भावसार, ‘सुशील नेत्रपेढी’चे समन्वयक राहुलदेव जाधव, डॉ. रोहित पाटील, ऋषिकेश जाधव तसेच सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश राका आणि किरण बर्डिया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नहाटा कुटुंबीयांच्या या समाजोपयोगी आणि प्रेरणादायी निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, या घटनेमुळे नेत्रदानाबाबत जनजागृतीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Comments are closed.