NGN News
Latest Marathi News

खरातचे ‘उद्योगांना’ ऊर्जा, विशेष पूजा, शरीरशांती’ सारखी विशेषणे

  • आणखी ११ पीडितांचे लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : स्वयंघोषित कॅप्टन आणि भोंदूबाबा अशोक खरात याने केवळ लोकांची आर्थिक फसवणूकच केली नाही, तर ‘ऊर्जा आणि शांती’च्या नावाखाली महिलांचे अमानुष लैंगिक शोषण केल्याचे आता उघड होत आहे. प्राप्त माहितीनुसार, आणखी ११ पीडित महिलांनी पुढे येत खरातवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आता प्रचंड वाढली आहे. या सर्व तक्रारींची चौकशी शहानिशा करून एसआयटी पुढील कारवाई करणार आहे.

खरात हा महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवाचे भीती दाखवत असे. तुझ्या पतीचा किंवा मुलाचा मृत्यू होईल, अशी भीती घालून तो महिलांचे मानसिक खच्चीकरण करायचा. त्यानंतर ‘ऊर्जा, विशेष पूजा आणि शरीरशांती’ मिळवून देण्याच्या बहाण्याने तो या महिलांचे शारीरिक शोषण करत असे. अनेक महिलांनी आपली हक्काची मालमत्ता आणि जमीनही खरातने दहशतीखाली बळकावल्याची माहिती पुढे आली आहे. हेल्पलाइनवर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा एसआयटी पथक करत असून, मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जात आहे. आतापर्यंत भोंदू अशोक खरातविरुद्ध एकूण १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महिला अत्याचाराचे ८, तर फसवणुकीचे ४ गुन्हे असून त्यांचा सखोल तपास सुरू आहे.

४,६५० अश्लील लिंक डिलीट

खरातवर ६० दिवसांत दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ३० साक्षीदार तपासले असून त्यांची साक्ष महत्त्वाची ठरेल, अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. खरातशी संबंधित ४,६५० अश्लील लिंक सायबर टिमने डिलीट केल्या, तर सोशल मीडियावरील ४५० अकाउंट देखील कायमची डिलीट केली आहेत. खरातच्या मालमत्तेसंबंधी कागपदपत्रे ईडीकडे सोपविण्यात आल्याचेही सातपुते यांनी सांगितले.

Comments are closed.