
- तीन जिल्ह्यांत विविध मालमत्तांची खरेदी; सारे व्यवहार रोख स्वरुपात
- चार वर्षांत 70 कोटींची बेनामी मालमत्ता
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी एसआयटीकडून कसून चौकशी सुरु असताना विविध धक्कादायक प्रकरणांची उकल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खरात याने नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांमध्ये आपला व्यावसायिक विस्तार करताना अवघ्या चार वर्षांत 70 कोटींची बेनामी मालमत्ता उभी केल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे सारे व्यवहार रोख स्वरुपात केल्याची कबुलीही त्याने चौकशीदरम्यान दिली आहे.
एसआयटीने मोबाईलमधून डेटा जप्त केल्यानंतर महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. त्यानुसार, त्याने नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठी गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक व्यवहारांमध्ये भागीदार म्हणून इतरांची नावे लावली आहेत. समता आणि जगदंबा या दोन पतसंस्थांच्या माध्यमातून वेगवेगळ्या लोकांच्या नावे खाते उघडून या खात्यांवर अशोक खरात हा व्यवहार करत होता. सावकारीचे काम करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करण्याचा गोरखधंदाही यानिमित्त उघड झाला आहे. पोलिसांनी या दोन्ही पतसंस्थांना पत्र लिहून खरात याच्या खात्यांची माहिती मागवली आहे.
‘समता’ मध्ये 60 कोटींचे व्यवहार
कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी शंभर खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून खरात याचे नाव असल्याची माहिती आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे. खरात वारसदार असलेली खाती प्रतिभा चाकणकर आणि आणखी एक चाकणकर अशा दोन नावांनी खाते असल्याची माहिती आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला आहे.
Comments are closed.