
- लोकसभेत संभावित धोक्यांचा वाचला पाढा
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक :नाशिकमध्ये होऊ घातलेल्या आगामी सिहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या ए.आय. आधारित सीसीटीव्ही व ट्रॅफिक सर्व्हेलन्स यंत्रणेबाबत गंभीर सायबर सुरक्षा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत बोलताना दिलाय. या अत्याधुनिक यंत्रणेमुळे सुरक्षेची पातळी वाढणार असली तरी, त्यात सायबर त्रुटी राहिल्यास तीच प्रणाली राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभा सभागृहात बोलताना खासदार वाजे यांनी नमूद केले की, प्रस्तावित प्रणालीमध्ये फेशियल रिकग्निशन, ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन (ANPR), ए.आय. आधारित विश्लेषण आणि सेंट्रलाइज्ड कमांड अँड कंट्रोल सेंटरचा समावेश आहे. या माध्यमातून शहरातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवता येणार असले तरी, सायबर हल्ला किंवा अनधिकृत प्रवेश झाल्यास रिअल-टाइम क्राउड मूव्हमेंट, सुरक्षा तैनाती आणि व्ही.व्ही.आय.पी. मार्गांची संवेदनशील माहिती बाहेर जाण्याचा गंभीर धोका संभवतो. कुंभमेळ्यासारख्या जागतिक स्तरावरील धार्मिक सोहळ्यात कोट्यवधी भाविक, संत, विदेशी पाहुणे आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याने, अशा प्रकारची माहिती गळती ही केवळ स्थानिक नव्हे तर राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न ठरू शकते, असेही त्यांनी अधोरेखित केले.
या पार्श्वभूमीवर खासदार वाजे यांनी केंद्र सरकारकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यामध्ये संपूर्ण सर्व्हेलन्स यंत्रणेचा राष्ट्रीय स्तरावर सायबर सिक्युरिटी ऑडिट करणे, राष्ट्रीय महत्त्वपूर्ण माहिती पायाभूत सुविधा संरक्षण केंद्र (NCIIPC) मार्फत तपासणी, स्वतंत्र पेनिट्रेशन टेस्टिंग, सर्व डेटा सर्व्हर्स भारतामध्येच सुरक्षित ठेवणे, तसेच महत्त्वाच्या यंत्रणेत असुरक्षित विदेशी घटकांवर निर्बंध आणणे यांचा समावेश आहे. तसेच गृह मंत्रालया अंतर्गत कुंभमेळ्यासाठी विशेष सायबर मॉनिटरिंग यंत्रणा स्थापन करण्याचीही त्यांनी मागणी केली.
नाशिक-त्रंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणारी ही प्रणाली ही एकीकडे सुरक्षेचा मजबूत आधार ठरू शकते, मात्र सायबर सुरक्षेतील त्रुटीमुळे तीच संभाव्य धोका बनू शकते, असा स्पष्ट संदेश खासदार वाजे यांनी आपल्या लोकसभेतील भाषणात दिलाय.
—–
“नाशिक कुंभमेळ्यासाठी उभारली जाणारी AI-आधारित सर्व्हेलन्स प्रणाली ही सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असली तरी, योग्य सायबर संरक्षणाशिवाय तीच राष्ट्रीय सुरक्षेतील सर्वात मोठी कमकुवत कडी ठरू शकते. आज घेतलेली खबरदारीच उद्याच्या सुरक्षेची हमी ठरेल,” : राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक
संभावित धोके
- हॅकिंगचा धोका: सीसीटीव्ही व कमांड सेंटरवर अनधिकृत प्रवेश
- संवेदनशील माहिती गळती: गर्दी, सुरक्षा तैनाती, व्हीव्हीआयपी मार्ग बाहेर जाणे
- ए.आय. मध्ये फेरफार: चुकीची ओळख, गुन्हेगार सुटण्याची शक्यता
- विदेशी घटकांचा धोका: डेटा बाहेर जाणे / बॅकडोअर रिस्क
- सिस्टम फेल्युअर: नेटवर्क बंद पडल्यास मोठी अव्यवस्था
- फीडमध्ये छेडछाड: खोटे किंवा बदललेले सीसीटीव्ही दृश्य
- इनसाइडर गैरवापर: आतून डेटा लीक किंवा दुरुपयोग
या केल्या मागण्या ..
- संपूर्ण सर्व्हेलन्स यंत्रणेचा राष्ट्रीय स्तरावर सायबर सिक्युरिटी ऑडिट
- National Critical Information Infrastructure Protection Centre (NCIIPC) मार्फत तपासणी
- स्वतंत्र पेनिट्रेशन टेस्टिंग
- सर्व डेटा सर्व्हर्स भारतामध्येच सुरक्षित ठेवणे
- महत्त्वाच्या यंत्रणेत असुरक्षित विदेशी उपकरणांवर निर्बंध
- केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत विशेष सायबर मॉनिटरिंग यंत्रणा स्थापन करणे
Comments are closed.