NGN News
Latest Marathi News

नाशिकला डिफेन्स हब करण्यासाठी पुढाकार एचएएल सकारात्मक

  • निमा पदाधिकाऱ्यांची नवनिर्वाचित सीईओं शिशिर पात्रा यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : नाशिकला देशातील महत्त्वाचे डिफेन्स हब म्हणून विकसित करावे तसेच संरक्षण क्षेत्रासाठी सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) किंवा खाजगी तत्त्वावर अँकर युनिट स्थापन करण्याबाबत नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) अध्यक्ष आशिष नहार व पदाधिकाऱ्यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)चे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर पात्रा यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.

भारत सरकारच्या संरक्षण खात्याच्या सचिव राजेश कुमार सिंग यांच्याशी नुकत्याच झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने पुढील पावले उचलण्याच्या दृष्टीने शिशिर पात्रा यांच्यासोबत झालेल्या या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

एचएएलकडे विविध विमानांच्या ऑर्डर्स असल्याने विमानासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुट्या भागांसाठी नाशिक औद्योगिक नगरी सज्ज असून नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी पोषक औद्योगिक वातावरण उपलब्ध आहे व येथे मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे नियोजन निश्चित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे नाशिकमध्ये संरक्षण उत्पादनासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा खाजगी तत्त्वावर अँकर युनिट स्थापन झाल्यास पूरक उद्योगांची वाढ, नाविन्यपूर्ण उपक्रम, रोजगारनिर्मिती, संशोधन व विकास तसेच देशाची संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी ते मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी व्यक्त केला. या संदर्भात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी निमासह सर्व औद्योगिक संघटना तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एचएएलच्या सहकार्याने आणि शेकडो उद्योजकांच्या पाठबळामुळे नाशिकची औद्योगिक नगरी संरक्षण उत्पादन क्लस्टर म्हणून विकसित होण्यासाठी सज्ज असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. धोरणात्मक पाठबळ आणि आवश्यक पायाभूत सुविधांसह नाशिक हे संरक्षण उत्पादन क्षेत्रात भारताला आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला मोलाचे योगदान देऊ शकते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडेच डिफेन्स कॉरिडोर बनवण्यासाठी साठी केलेल्या घोषणांमुळे नाशिकला संरक्षण व एरोस्पेस क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित करण्याबाबतची त्यांची वचनबद्धता स्पष्ट झाली आहे. नाशिकमध्ये आधीच अचूक अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असलेल्या १,००० हून अधिक एमएसएमई उद्योगांमुळे येथे संपूर्ण संरक्षण उत्पादन कॉरिडॉर उभारण्याची क्षमता असल्याचेही निमाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नाशिकला औपचारिकपणे संरक्षण उत्पादन केंद्र घोषित करून आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी व मालवाहतुकीत वाढ होत असून २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करणे आवश्यक असल्याचेही निमाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. संरक्षण क्षेत्राशी संबंधित लॉजिस्टिक्स, कार्गो वाहतूक आणि एरोस्पेस कनेक्टिव्हिटी मजबूत करण्यासाठी ही मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीदरम्यान मांडण्यात आलेल्या सर्व मागण्या संरक्षण खात्याकडे पाठवून त्यावर गांभीर्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन एचएएलचे सीईओ शिशिर पात्रा यांनी दिले. ही चर्चा अत्यंत सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

या बैठकीला निमा अध्यक्ष आशिष नहार, उपाध्यक्ष मनीष रावल, सचिव राजेंद्र अहिरे व एचएएलचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.