NGN News
Latest Marathi News

रु.२५०० मोजा आणि आठ मिनिटांत त्र्यंबकराजाचे दर्शन घ्या..

  • लवकरच सदर होणार ‘ब्रेक दर्शन’योजना ; दररोज ५०० भाविकांना मिळणार लाभ


** एनजीएन न्यूज नेटवर्क

त्र्यंबकेश्वर : भाविकांची वाढती गर्दी आणि दर्शन तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून ‘ब्रेक दर्शन’ योजना सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अडीच हजार रुपये शुल्क भरून भाविकांना अवघ्या आठ मिनिटांत दर्शन घेता येणार आहे. लवकरच ही योजना सुरु होणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाकडून देण्यात आली.

या सुविधेचा लाभ दररोज सुमारे ५०० भाविकांना मिळणार असून, यासाठी स्वतंत्र काउंटर उभारण्यात येणार आहे. तसेच या दर्शनार्थींसाठी विशेष ओळख व्यवस्था देखील ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

सध्या मंदिरात मोफत धर्मदर्शन आणि २०० रुपयांच्या देणगी दर्शनासाठी स्वतंत्र रांगा आहेत. मात्र, मुख्य मंदिराजवळ दोन्ही रांगांचा संगम होत असल्याने मोठी गर्दी आणि विलंब होत असतो. नव्या ‘ब्रेक दर्शन’ योजनेत अडीच हजार रुपयांचे तिकीट घेतलेल्या भाविकांसाठी ही रांग काही काळ थांबवून त्यांना थेट दर्शनाची संधी दिली जाणार आहे. यासाठी सुमारे पाच मिनिटांचा ‘ब्रेक’ दिला जाईल आणि भाविक दर्शन घेऊन आठ मिनिटांच्या आत बाहेर पडेल, अशी व्यवस्था प्रस्तावित आहे.

देवस्थान ट्रस्टकडून ही योजना लवकरच सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली, तरी २०० रुपयांचे देणगी दर्शन पूर्ववत सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, प्रत्यक्षात ही योजना कशा पद्धतीने राबवली जाते आणि त्याचा सर्वसामान्य भाविकांवर काय परिणाम होतो, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed.