
** एनजीएन न्यूज नेटवर्क
नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाच्या वतीने गत 50 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेला गंगापूजानाचा सोहळा आज मोठया मंगलमय व भावपूर्ण वातावरणात, गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा व नितीनभाऊ मोरे, विजय शिखरे गुरुजी व मान्यवरांच्या उवस्थितीत आणि राज्यभरातून प्रातिनिधिक स्वरूपात आलेल्या हजारो सेवेकरी व भाविकांच्या साक्षीने संपन्न झाला.रामकुंडावर सुरु असलेल्या सिंहस्थ कामांमुळे यावर्षी हा सोहळा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संपन्न झाला आणि या सोहळ्याने उपस्थितांना सिंहस्थ कुंभमेळ्याचीच अनुभूती दिली.
जेष्ठ महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून दशमी असे दहा दिवस भारतभर गंगा दशहरा उत्सव मोठया भावभक्तीने साजरा केला जातो.
“भारतात नद्यांना आम्ही मातेचा सन्मान दिला आहे.नदी जीवसृष्टीला सजीवत्व देते.पवित्रता, शुद्धता, निर्मळता, प्रक्षालन, परिष्कार, संयम, परोपकार, पापमुक्ती या सर्वांचं प्रतीक आपण गंगा गोदा मातेस मानतो. या मातेशी आपले मानसिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक दृढ भावबंध युगानुयुगे घट्ट रुजले आहेत म्हणूनच आज जीवसृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या गंगा गोदावरी मातेचे यथाससांग पूजन करून आपण सर्व तिचा सन्मान करत असल्याची भावना प पू गुरुमाऊलींसह सेवेकऱ्यांनी व्यक्त केली.
गंगापूजनाच्या मुख्य सोहळ्यात पुरोहित संघांचे शिखरे गुरुजी आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रकल्याण, राष्ट्ररक्षण, सर्व जीवसृष्टीचे कल्याणाचे साकडे गुरुमाऊली व उपस्थित सेवेकऱ्यांच्या वतीने गोदामाईस घातले आणि मंत्रघोषात यथासांग गंगापूजन सर्वांकडून करून घेतले.गंगा गोदावरी मातेची आरतीही गुरुमाऊली यांचे हस्ते झाली.
याप्रसंगी उपस्थित सेवेकरी व भाविकांशी गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी हितगुज केले, “गोदामाई त्र्यंबकेश्वरी अवतरीत होऊन आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रीस सागरास मिळते. तिने आपल्या तिरावरील दीड हजार किलोमीटरचा परिसर सर्वार्थाने सुजलाम सुफलाम केला आहे. राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झालाआणि बळीराजाचे अतोनात नुकसान झाले. येत्या पावसाळ्यात पर्जन्यराजाने कृपा करावी व सुवृष्टी व्हावी यासाठी आपण गोदामाईच्या माध्यमातून पर्जन्यराजास विनंती केली तर तो निश्चितच आपणावर कृपा करेल . पर्जन्यराजाने कृपा करून सर्व जीवसृष्टीला नवचैतन्य द्यावे,विशेषतः शेतकरी सुखी, संपन्न व्हावा आणि शेतकरी राजाच्या आत्महत्या थांबाव्यात अशीच आपली मनोकामना आज गोदामाईकडे व्यक्त करत आहोत असे सांगून ती आपली हाक ऐकून निश्चितच आपली ही इच्छा पूर्ण करेल.”असा विश्वासही गुरुमाऊली यांनी व्यक्त केला. विपुल पर्जन्यवृष्टी साठी देशभरातील सर्व स्वामी केंद्रावर एप्रिल महिन्यापासूनच पर्जन्य सूक्त पठण सुरु आहे व पावसाळा संपेपर्यंत ही सेवा सुरूच राहणार आहे.
मिरवणूकीने वेधले लक्ष
आजच्या गंगापूजन सोहळया निमित्त कुशावर्त तीर्थ ते श्री स्वामी समर्थ गुरुपीठ अशी गंगाजलकलश भव्य मिरवणूक काढण्यात आली. सुशोभीत रथात गंगाजल कलश आणि श्री स्वामी समर्थ विराजमान होते. उदयनगर ते रामकुंड संपूर्ण यात्रा मार्गांवर महिला सेवेकऱ्यांनी हाती घेतलेले भगवे ध्वज, पताका, मंगल कलश घेतलेल्या युवती, महिला आणि स्वामीनामाचा जयघोष करीत स्वामीनामत दंग झालेले शेकडो सेवेकरी, यामुळे मंगलमय वातावरण सर्वत्र होते. ही मिरवणूक गुरुपीठात पोचताच मुख्य सोहळा सुरु झाला.
स्वच्छता अभियान
आज सेवेकरी वर्गाने सर्वत्र गोदामाई आणि आपापल्या गावातील नदीवर जाऊन गंगापूजन करून सन्मान केलाच पण या दशहरा पुण्यकाळात आपापल्या गावातील नदी, नाले, तलाव स्वच्छ करून वृक्षारोपण करण्याचा कार्यक्रम सुद्धा महिला पुरुष सेवेकऱ्यांनी हाती घेतला आहे.
Comments are closed.