
** एनजीएन न्यूज नेटवर्क
लासलगाव : राकेश बोरा
जिद्द, चिकाटी आणि अफाट आत्मविश्वासाच्या जोरावर निफाड तालुक्यातील गोळेगाव येथील कुमारी आदिती संदीप मुदगुल हिने अयोध्या ते नेपाळ असा तब्बल ६७० किलोमीटरचा धावण्याचा विक्रमी प्रवास पूर्ण करत महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
आदितीने ५ मे रोजी अयोध्येतील पवित्र राम मंदिरातून आपल्या धाव मोहिमेला सुरुवात केली. या अत्यंत कठीण प्रवासात प्रचंड उष्णता, शारीरिक ताण, लांबचा पल्ला आणि नेपाळमधील उंच डोंगर-दऱ्यांचा खडतर मार्ग अशा अनेक अडचणींवर मात करत तिने अपूर्व धैर्य आणि चिकाटीचे दर्शन घडवले.
दररोज सुमारे ८० ते ९५ किलोमीटर अंतर पार करत तिने केवळ ७ दिवस १५ तासांत हा विक्रमी प्रवास पूर्ण केला. १२ मे रोजी दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी नेपाळमध्ये धाव पूर्ण करत तिने जागतिक विक्रमाला गवसणी घातली. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीची नोंद ‘इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ तसेच ‘मिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली आहे.
या ऐतिहासिक यशामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या मोहिमेसाठी अभिजित विष्णू भालेराव यांनी मार्गदर्शन केले, तर तिचे वडील संदीप संतू मुदगुल यांनी संपूर्ण प्रवासात साथ देत तिचा आत्मविश्वास वाढवला. आदितीच्या या धाडसी कामगिरीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली असून, तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Comments are closed.