NGN News
Latest Marathi News

कल्पना खरात हिची अटक अटळ; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात हिच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण तिने केलेला अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज राहता ( जि. अहिल्यानगर ) येथील न्यायालयाने फेटाळला आहे. यामुळे तिची अटक अटळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी याप्रकरणी झालेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला. 

गेल्या १७ मार्च रोजी अशोक खरात यास अटक झाल्यानंतर कल्पना खरात ३१ मार्चपासून फरार असून पोलिसांकडून तिचा शोध घेतला जात आहे, एसआयटी पथकाने कल्पना खरातच्या नाशिकमधील काही जवळच्या मैत्रिणींची चौकशी केली. तसेच, खरातच्या घरी सध्या काम करणारे आणि यापूर्वी काम सोडून गेलेल्या नोकरांकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कल्पना नेमकी कोणाच्या संपर्कात होती किंवा ती कुठे आश्रय घेऊ शकते, या दिशेने पोलीस तपास करत आहेत.

सव्वा तास चालला युक्तिवाद

कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहता येथील न्यायालयात सुनावणी झाला, त्यावर न्यायमूर्तींनी कल्पना खरातचा जामीन अर्ज फेटाळला आहे. तब्बल सव्वा तास युक्तिवाद चालला होता, आरोपीच्या वतीने प्रशांत गिरी यांनी युक्तिवाद केला. मात्र, सरकारी वकील व तपास अधिकाऱ्याने आरोपींच्या वकिलाचे मुद्दे खोडले. त्यावर, न्यायालयाने निर्णय दिल्याने कल्पना खरातच्या अडचणीत वाढ झाली असून शिर्डी पोलिसांसमोर कल्पना खरातच्या शोधाचे आव्हान आहे. 

Comments are closed.