NGN News
Latest Marathi News

नाशिकच्या तीन रुग्णालयांकडून पावणेदोन कोटींची कथित फसवणूक

  • गरीबांच्या आरोग्य योजनांवर डल्ला
  • खोटे उपचार दाखवून बिले मंजूर; बनावट कागदपत्रे, खोट्या रुग्ण नोंदींचा आरोप, पाच पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या आरोग्य योजनांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमधील तीन खासगी रुग्णालयांनी प्रत्यक्षात उपचार न देता रुग्णांच्या नावावर खोटे दावे सादर करून सुमारे १ कोटी ७९ लाख ४३ हजार रुपयांचा निधी उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या तक्रारीनंतर मुंबईतील वरळी पोलिस ठाण्यात संबंधित तीन रुग्णालयांच्या पाच पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, शिव मल्टिस्पेशालिटी अँड क्रिटिकल केअर रुग्णालय, नाशिक ग्रेस रुग्णालय आणि ऋषिकेश रुग्णालय या तीन संस्थांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिवांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती.


आरोग्य योजनांच्या नावाखाली कथित गैरव्यवहार
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना आणि इतर शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत उपचारांची बिले मंजूर करण्याची प्रक्रिया मुंबईतील वरळी येथील ‘जीवनदायी भवन’मार्फत केली जाते. या योजनांतील दाव्यांबाबत संशय निर्माण झाल्यानंतर शासनाने जीवनदायी पोर्टलवरील दाव्यांची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
तपासणीत नाशिकमधील ३६१ दावे संशयास्पद असल्याचे आढळले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत अनेक प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष उपचार न करता उपचार झाल्याचे दाखवून बिले मंजूर करून घेतल्याचा आरोप समोर आला.


बनावट कागदपत्रे, खोटी माहिती सादर
आरोग्य विभागाच्या तपासणीनुसार, लाभार्थ्यांची कागदपत्रे वापरून खोट्या रुग्ण नोंदी तयार करण्यात आल्या. बनावट कागदपत्रे आणि चुकीची माहिती पोर्टलवर अपलोड करून शासनाकडून उपचार खर्चाची बिले मंजूर करून घेतल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

चौकशीतील कथित गैरव्यवहार असा :
शिव मल्टिस्पेशालिटी अँड क्रिटिकल केअर रुग्णालय – १६३ प्रकरणे, ₹७१.८३ लाख
नाशिक ग्रेस रुग्णालय – १२६ प्रकरणे, ₹६२.१४ लाख
ऋषिकेश रुग्णालय – ७२ प्रकरणे, ₹४५.४६ लाख
या तिन्ही रुग्णालयांनी मिळून सुमारे ₹१.७९ कोटींची कथित फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पडताळणीत धक्कादायक बाबी
देवळा, कळवण आणि दिंडोरी तालुक्यातील लाभार्थ्यांच्या दाव्यांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. त्यावेळी अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही लाभार्थ्यांनी संबंधित रुग्णालयांमध्ये उपचारच घेतले नसल्याचे स्पष्ट झाले. काहींनी अन्य रुग्णालयांमध्ये उपचार घेतले होते, तर काही लाभार्थ्यांचा उपचार दाखविण्यात आलेल्या तारखेपूर्वीच मृत्यू झाल्याचेही तपासात आढळून आले. तरीही त्यांच्या नावावर उपचार दाखवून शासनाकडून निधी मंजूर करून घेतल्याचा आरोप आहे.

पुढील तपास सुरू
या प्रकरणामुळे सरकारी आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लाभार्थ्यांच्या नावाचा गैरवापर करून सरकारी निधी लाटण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वरळी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला असून, या गैरव्यवहारात आणखी कोणी सहभागी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

Comments are closed.