
- ईएसआयएस कार्डधारकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी
नंदी हिल्स | एनजीएन न्यूज नेटवर्क
कर्मचारी राज्य विमा योजना (ESIS) अंतर्गत समाविष्ट असलेल्या हजारो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील ‘एसएमबीटी हॉस्पिटल आणि महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी (MH-ESI Society) यांच्यात एक विशेष सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. नुकत्याच झालेल्या या करारानुसार, आता सर्व ईएसआयएस (ESIS) कार्डधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दुय्यम (Secondary) दर्जाचे सर्व वैद्यकीय उपचार आणि निदान चाचण्या पूर्णपणे ‘कॅशलेस’ म्हणजेच मोफत उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एसएमबीटी हॉस्पिटलसोबतच्या या महत्त्वपूर्ण करारामुळे (Tie-up) नाशिक, इगतपुरी, सिन्नर, कोपरगाव, अकोले, संगमनेर, अहिल्यानगरसह ठाणे पालघर परिसरातील औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या हजारो कर्मचारी वर्गाला मोठ्या कॉर्पोरेट दर्जाच्या हॉस्पिटलमध्ये मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या करारानुसार, एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये इएसआयएस लाभार्थ्यांना विविध विभागांतर्गत उपचार घेता येतील. यात जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, स्त्रीरोग व प्रसूती शास्त्र विभाग, बालरोग चिकित्सा, अस्थिरोग निवारण, कान, नाक, घसा (ENT) आणि दंतचिकित्सा, नेत्ररोग चिकित्सा, आयसीयु, यासोबतच हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या रेडीऑलॉजी तपासण्या आणि ब्लड बँक यांसारख्या अत्याधुनिक तपासणी सेवाही लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार मिळवण्यासाठी रुग्णाकडे सक्षम प्राधिकरणाने दिलेले वैध इएसआयएस (ESIS) ओळखपत्र (E-Pehchan Card) किंवा आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. रुग्णांना उपचार घेण्यासाठी एमएच-ईएसआय सोसायटीच्या संबंधित वैद्यकीय अधीक्षक, प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी किंवा प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अधिकृत रेफरल पत्र आणावे लागेल. या पत्राची वैधता जारी केल्यापासून ७ दिवसांपर्यंत असेल.
दरम्यान, जर एखादा रुग्ण अत्यवस्थ परिस्थितीत थेट हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, तर त्याला उपचारासाठी रेफरल पत्राची वाट पाहावी लागणार नाही. अशा वेळी रुग्णाने स्वतःचे ईएसआयएस कार्ड दाखवून प्रवेश मिळवायचा आहे. त्यानंतर २४ तासांच्या आत संबंधित ईएसआयएस अधिकाऱ्यांकडून त्या रुग्ण प्रवेशाचे नियमन (Regularization) करून घेतले जाईल. ज्यामुळे रुग्णाला कोणताही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही. याबाबत वैद्यकीय प्रशासन अधिकारी डॉ. अनिता भामरे, प्रशासन कार्यालय अधिकारी डॉ. अंजली नागपूरकर आणि दुय्यम (Secondary) विभाग अधिकारी डॉ. प्राजक्ता जाधव यांनी सांगितले.
चौकट १
एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये आम्ही केवळ उपचार करत नाही, तर अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे रुग्णांना नवजीवन देण्याचा प्रयत्न करतो. कर्मचारी राज्य विमा योजनेच्या (ESIS) या करारामुळे आता सामान्य कर्मचाऱ्यालाही एकाच छताखाली २५ पेक्षा अधिक स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी सेवांचा लाभ घेता येईल. आर्थिक अडचणीशिवाय कुठल्याही कर्मचाऱ्याला पूर्णपणे कॅशलेस उपचार उपलब्ध होतील. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा प्रत्येकाच्या आवाक्यात आणणे, हेच आमचे ध्येय आहे.
सचिन बोरसे, संचालक, आरोग्यसेवा
चौकट २
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा सोसायटी (MH-ESI Society) आणि एसएमबीटी हॉस्पिटल यांच्यातील या सामंजस्य करारामुळे नाशिक जिल्ह्यातील व परिसरातील हजारो कर्मचारी बांधवांना आणि त्यांच्या कुटुंबांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी गंभीर आजार आणि दुय्यम दर्जाच्या उपचारांसाठी कर्मचारी रुग्णांना मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जावे लागायचे, ज्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि मानसिक ताण प्रचंड वाढायचा. आता या टाय-अपमुळे कामगारांना इतर शहरांत जाण्याची अजिबात गरज उरलेली नाही. इतर सर्व वैद्यकीय विमाधारक आणि सी.जी.एच.एस. (CGHS) रुग्णांप्रमाणेच, आता ESIS च्या लाभार्थ्यांनाही नाशिकमध्ये, त्यांच्या हक्काच्या परिसरात, एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये कॉर्पोरेट दर्जाच्या सर्व वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर आणि अत्याधुनिक चाचण्या पूर्णपणे मोफत आणि कॅशलेस मिळतील. कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि त्यांचा उपचार करून घेणे यावर ईएसआयएस काम करत आहे.
वैद्यकीय अधीक्षक, ESIS रुग्णालय, नाशिक
Comments are closed.