NGN News
Latest Marathi News

निदा खान टीसीएस प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’; छळाच्या 70 हून अधिक…

  • आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न; ७८ संशयास्पद कॉल रेकॉर्ड, ई-मेल्स आणि चॅट्स जप्त

** एनजीएन न्यूज नेटवर्क

नाशिक : येथील बहुचर्चित टीसीएस प्रकरणात एचआर व्यवस्थापक आणि सहायक महाव्यवस्थापक यांनी छळाच्या 70 हून अधिक संदेशांकडे दुर्लक्ष केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोपींनी पीडितांकडून वारंवार करण्यात आलेल्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असा दावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने ( एसआयटी) बुधवारी केला.

प्राप्त माहितीनुसार, एचआर व्यवस्थापक निदा खान ही या प्रकरणातील कथित ‘मास्टरमाइंड’ असून तिने तक्रारी दडपण्याचा आणि आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींमधील सुमारे ७८ संशयास्पद कॉल रेकॉर्ड, ई-मेल्स आणि चॅट्स जप्त केले आहेत. संभाव्य आर्थिक व्यवहारांचे पुरावेही हाती लागल्याचे सांगण्यात आले आहे. निदा खान हिने पीडितांना वारंवार हे प्रकरण सोडून देण्यास सांगितले आणि कार्यालयातील POSH (कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंध) समितीची सदस्य असूनही कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

दरम्यान, नाशिक शाखेतील सहायक महाव्यवस्थापक यांनी गुन्हा नोंदवल्यानंतरही तिसरा आरोपी दानिश शेख याच्याशी संपर्क ठेवला होता. अटकेपूर्वी त्यांनी त्याला फोन केल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले. कॉल आणि ई-मेल नोंदींच्या विश्लेषणानंतर एसआयटी आरोपींमधील “साटेलोटे”च्या शक्यतेचाही तपास करत आहे. या प्रकरणात एकूण ९ गुन्हे नोंदवले गेले असून, त्यापैकी १ देवलाली कॅम्प पोलीस ठाण्यात आणि ८ मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आतापर्यंत ९ तक्रारी समोर आल्या असून, त्यात एका पुरुषाचाही समावेश आहे. तक्रारींमध्ये छळ, अत्याचार आणि सक्तीच्या धर्मांतराचे आरोप करण्यात आले आहेत.

१३ एप्रिल रोजी न्यायालयाने ऑपरेशन्स मॅनेजरला पुढील पोलीस कोठडी सुनावली होती. मुख्य आरोपी दानिश शेख याच्यासह आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी हे सध्या नाशिक रोड कारागृहात आहेत.

अंतर्गत चौकशीचे आदेश

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीही अंतर्गत चौकशीचे आदेश दिले असून या आरोपांना “अत्यंत चिंताजनक आणि वेदनादायक” असे म्हटले आहे. कंपनीने आरोपी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली असून तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

“टाटा समूह आपल्या कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या जबरदस्ती किंवा गैरवर्तनाबाबत शून्य-सहनशीलतेचे धोरण पाळतो,” असे निवेदनात म्हटले आहे. तसेच, तथ्य शोधून सर्व जबाबदार व्यक्तींना ओळखण्यासाठी सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटना २०२२ ते २०२६ या कालावधीतील

तपासादरम्यान पोलिसांनी ४० हून अधिक CCTV फुटेजची तपासणी केली असून पीडित व आरोपींचे जबाब नोंदवले जात आहेत. एका आरोपीला पकडण्यासाठी महिला पोलिसांच्या मदतीने गुप्त कारवाईही करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार, या घटना २०२२ ते २०२६ या कालावधीत घडल्याचे सांगितले जात आहे. तपास अद्याप सुरू असून सर्व पैलूंची सखोल छाननी केल्यानंतर अंतिम निष्कर्ष जाहीर करण्यात येणार आहेत.

Comments are closed.